शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी आपल्या जीवनाचा संपूर्ण ध्यास शिक्षण प्रसारासाठी घेतला होता.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शाळा,महाविद्यालये आणि वसतिगृहांची स्थापना केली.या महान कार्यामागे त्यांच्या पत्नी सुमनआई मोहेकर यांचा त्याग, समर्पण,आणि निःस्वार्थ योगदान होते. मोहेकर गुरुजींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सुमनआई यांनी स्वतःला झोकून दिले होते.त्या विद्यार्थ्यांची आईसारखीच काळजी घेत आणि त्यांच्यासाठी स्वतः स्वयंपाक करून त्यांना जेवू घालायच्या.ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी येत असलेल्या आर्थिक आणि सामाजिक अडचणींची जाणीव त्यांना होती.त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी नेहमीच कष्ट घेतले. मोहेकर कुटुंब अनेकदा आर्थिक अडचणींना सामोरे गेले,परंतु या परिस्थितीने सुमनआईंच्या समर्पणाला कधीच कमी केले नाही.वेळप्रसंगी विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमनआईंनी आपल्या अंगावरील दागिने गहाण ठेवले.या त्यागातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि वसतिगृहाच्या व्यवस्थेसाठी आर्थिक पाठबळ उभे केले.त्यांच्या या कृतीतून शिक्षणासाठीचा त्यांचा प्रखर विश्वास आणि निस्वार्थ वृत्ती दिसून येते. सुमनआई मोहेकर यांचे कार्य केवळ मोहेकर गुरुजींना सहकार्य करणारे नव्हते,तर ते समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले.त्यांनी विद्यार्थ्यांबद्दल दाखवलेले ममत्व आणि शिक्षणासाठी केलेला त्याग हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. आज मोहेकर गुरुजींना शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाते, परंतु त्यांच्या यशस्वी कार्यामागील मूळ ताकद म्हणजे सुमनआईंचे निस्वार्थ योगदान आहे.त्याग,समर्पण,आणि शिक्षणासाठी असलेली त्यांची बांधिलकी यामुळेच अनेक विद्यार्थ्यांचे जीवन बदलले. त्यांच्या या त्यागमय कार्याची छाया आजही प्रेरणादायक आहे. कै.सुमनआई मोहेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले