कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाच्या विविध उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असून संघाचे आरोग्यकार्य, शिक्षणकार्य आणि सामाजिक कार्य हे अत्यंत उल्लेखनीय व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपातून ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोक मोहेकर यांनी केले. डॉ.मोहेकर यांनी पत्रकार संघाच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले की,पत्रकार हा केवळ बातम्या पोहोचविण्याचे काम करत नाही, तर समाजाला योग्य दिशादर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्यही पार पाडतो.पत्रकार संघाच्या माध्यमातून होत असलेले आरोग्य तपासणी शिबिरे,शैक्षणिक मदत योजना आणि सामाजिक समस्यांवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न हे खरोखर कौतुकास्पद आहे.
पत्रकार दिनानिमित्त शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या पत्रकारांचा कौतुक सोहळा या कार्यक्रमात विशाल परदेशी मुंबई,चंद्रकांत करडे बार्शी,सुभाष कुलकर्णी तेर,मोहन तलकोकुल सोलापूर,शिवाजी सावंत देवधानोरा,सुभाष घोडके कळंब,अनिल क्षीरसागर इटकूर यांचा एनडीटीव्ही च्या डॉ.कविता राणे,लोकमतचे धर्मराज हल्लाळे, माध्यम व जनसंपर्क तज्ञ सचिन साळुंखे,राजकीय विश्लेषक अभय देशपांडे,डॉ. अशोकराव मोहेकर,धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात डॉ.कविता राणे यांनी वार्तांकन करीत असताना व वर्तमानपत्र चालवत असताना येणाऱ्या अडचणीचा खुलासा केला.धर्मराज हल्लाळे यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चितच पत्रकार हा पुरस्कारास पात्र होतो.त्याच बरोबर सचिन साळूंके,अभय देशपांडे,चंद्रसेन देशमुख यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक करून मार्गदर्शन केले.पुरस्कार प्राप्त सुभाष घोडके,मोहन तलकोकूल व अनिल क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमातच मान्यवरांच्या हस्ते सुभाष घोडके यांचे विरूंगुळा अर्थात पथनाट्य व अग्रलेखांचा संग्रह-२०२५ या पुस्तकाचे व भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या राजकीय कट्टा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केली.भारदस्त असे सूत्रसंचालन प्राचार्य जगदीश गवळी व प्राचार्य महादेव गपाट यांनी केले.शेवटी सर्वांचे आभार पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे यांनी मानले.सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले