लातूर – राष्ट्रीय,वांशिक,धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्का विषयी जनजागृती करून द्यायला हवी असे प्रतिपादन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. किसनाथ कुडके यांनी केले. ते येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला असून विचार मंचावर दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गुणवंत बिरादार,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे,डॉ.शिवप्रसाद डोंगरे,डॉ. नीता खानापुरे आणि संजय सोनवणे यांची उपस्थती होती. पुढे बोलताना प्रा.कुडके म्हणाले की,धर्म,भाषा,राष्ट्रीयत्व किंवा जात यावर अल्पसंख्यांक आधारित असतात. अल्पसंख्यांकांना त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, अल्पसंख्यांकांना त्यांची प्रगती साधता यावी याकरिता अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करून त्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न देशभरात सुरू आहे.अल्पसंख्यांकांना असणाऱ्या शैक्षणिक,सामाजिक आणि आर्थिक सेवा सवलती यांची जाणीव अधिकाधिक झाल्यास त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील,असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना डॉ.गुणवंत बिरादार म्हणाले की, अल्पसंख्यांकात नेहमी असुरक्षितेची भावना असते. संविधानाने त्यांच्या हक्क आणि अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. भारतीय नागरिक म्हणून त्यांना बहाल केलेले हक्क व अधिकार त्यांना बजावता येतात,असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार डॉ. शिवप्रसाद डोंगरे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग