धाराशिव (जिमाका) – राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 01 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान पशुसंवर्धन पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे.या पंधरवड्यात पशुधन उपचार सेवा पशुपालकांच्या अडचणी सोडविण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.त्याचप्रमाणे सध्या दुग्ध उत्पादक पशुधनाच्या दुधास 5 रुपये प्रति लिटर अनुदान योजनेबाबत पशुपालकांच्या सर्व अडचणींचे निराकरण करण्यासाठी योजनेत सहभागी असलेल्या सर्व घटकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पशुपालकांकडील गाई-म्हैस यांची वंध्यत्व तपासणी व त्यावर उपचार शिबिरांचे या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पशुधनाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पशुपालकांना मार्गदर्शन शिबीर आयोजित केले जाणार आहे.राष्ट्रीय पशुधन अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पशुसंवर्धनामध्ये उद्योजकता विकास करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गत शेळीपालन,कुक्कुटपालन, वैरण विकास आदी नवीन प्रकल्प राबविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.गावनिहाय केंद्र व राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या माहितीसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.वाय.बी.पुजारी यांनी सांगितले.
प्रत्येक गावाचा चारा आराखडा तयार करणे गुणवत्तापूर्ण पोषक चारा निर्मिती करणे, चारा टंचाईवर मात करणे, मुरघास निर्मितीबाबत शेतकरी तथा पशुपालकांना मार्गदर्शन या पंधरवड्यात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पशुधनाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सहभागी पशुधनाचे 100 टक्के जंत निर्मूलन रोगप्रतिबंधक लसीकरण तसेच पशुधनाला सकस आहार देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या मोहिमेतून समाधानकारक रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकरी व पशुपालकांनी या पशुसंवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
धाराशिव प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा
सोनवणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी