August 9, 2025

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकीदारांनी विविध ओ.टी.एस योजनांचा लाभ घ्यावा – डॉ.सचिन ओम्बासे

  • ** राज्य शासनाकडुन शेतकऱ्यांना रु.३ लाखापर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्याची सुरु आहे योजना
  • धाराशिव (जिमाका) – उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अनेकाकडे थकबाकी असल्याने बँक आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे.बँकेस अडचणीतून बाहेर काढून उर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती नेमली आहे.समिती माध्यमातून विविध ओ.टी.एस योजना आखण्यात आल्या आहेत.या योजनांचा सर्व थकबाकीदारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.
  • बँकेस उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी,धाराशिव यांचे अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची संनियंत्रण समिती गठित केलेली आहे. या समितीची पहिली बैठक १९ जुलै रोजी संपन्न झाली.समिती सदस्यांकडुन बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. बँकेची वाढलेली थकबाकी हे एक प्रमुख कारण बँक अडचणीत येण्यामागचे आहे.समितीने बँकेच्या आर्थिक बाजुचा विचार करून बँकेने थकबाकी वसुलीसाठी वेगवेगळ्या ओ.टी.एस.योजना अंमलात आणण्यासाठी सुचना करण्यात आल्या आहेत.त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व थकबाकीदारांना बँकेने तयार केलेल्या विविध ओ.टी.एस.योजनांचा लाभ घ्यावा. तसेच थकबाकीचा भरणा करून बँकेकडुन नवीन कर्ज घेण्यासाठी पात्र होत येईल.
  • राज्य शासनाकडुन शेतकऱ्यांना रु.३ लाखापर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्याच्या सुचना आहेत.याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.तसेच बिगरशेती कर्ज प्रकारातील ज्या संस्थांकडे बँकेची थकबाकी येणे आहे,अशा सर्व संस्थांच्या पदाधिकारी,अवसायक इत्यादींनी तातडीने थकबाकी भरणा करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करावी,यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.परिणामी या बँकेच्या सामान्य ठेवीदारांना त्यांच्या जमा असलेल्या ठेवी गरजेच्या वेळी उपलब्ध करून देऊन बँकेवरील ठेवीदारांचा विश्वास कायम राखण्यास मदत होणार आहे.तसेच जिल्ह्याच्या सहकारातील शिखर संस्थेस उर्जितावस्था प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील सहकारी चळवळीस नव्याने उभारी मिळेल.सहकारी चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होईल.तरी सर्व थकबाकीदार सभासदांनी/संस्थांनी आपल्याकडील थकीत रक्कमेचा संलग्न शाखेत भरणा करून नवीन कर्ज उचलण्यास पात्र व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म.संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
error: Content is protected !!