धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – धाराशिव येथील जिल्ह्यातील अनेकजणांनी प्रशासकीय सेवेत गौरवास्पद कामगिरी करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. त्यात आणखीन जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी धाराशिव जिल्ह्याचे सुपूत्र व सहकार नगर, पुणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत सुरेंद्र गजेंद्र माळाळे यांनी केली आहे. त्यांनी पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राजभवन मुंबई येथील दरबार सभागृहात 6 जून रोजी 2022 च्या प्रजासत्ताकदिनी जाहीर झालेली पोलीस पदके महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते माळाळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकार्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या रूपाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने त्यांचे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. धाराशिव शहरातील भीमनगर येथील ते रहिवाशी आहेत. स्मृतिशेष गजेंद्र आप्पाराव माळाळे व स्मृतिशेष मोहरबाई गजेंद्र माळाळे यांचे ते सुपूत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण धाराशिव शहरात तर उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येेथे झाले आहे. त्यांनी परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातून बी.एसस्सी व एम.एसस्सी पदवी मिळविली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्याच परिक्षेत ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवडले गेले. सन 1995 मध्ये ते पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले. त्यांनी आतापर्यंत नागपूर, गडचिरोली, सीआयडी गुन्हे शाखा, जालना पोलीस प्रशिक्षण, जालना स्थानिक गुन्हे शाखा आदी ठिकाणी आपले कर्तव्य बजावले आहे. माळाळे यांनी खून, दरोडे, घरफोडी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणली आहेत. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात त्यांनी सतत उद्भवणारी गंभीर परिस्थिती मोठ्या हिंमतीने हाताळली आहे. सुरेंंद्र माळाळे यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे स्वातंत्र्याचे 50 वर्षे पदक, खडतर सेवा पदक, अंतर्गत सुरक्षा पदक, डी.जी इन्सिगनिया अवॉर्ड, स्वातंत्र्याची 75 वर्षे पदक, उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून पोलीस महासंचालकांचे प्रशस्तीपत्र, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून उत्कृष्ट कार्याचे प्रशस्तीपत्र, 2022 चे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त आहेत.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश