धाराशिव (जिमाका) – सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्तवतीने आयोजित या महोत्सवाचा आनंद घेण्याची धाराशिवकरांना जणू मेजवानीच ठरत आहे.२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता शाहीर राणा जोगदंड यांनी जनजागृतीवर पोवाडा सादर करून सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर परशुराम सातपुते यांनी वासुदेव हा कलाप्रकार सादर केला.दुपारपासूनच शहरातील नागरिकांनी जिल्हा क्रीडा संकुलावर गर्दी करण्यास सुरुवात केली. कार्यक्रमास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत कलावंतांच्या कलागुणांना प्रचंड टाळयांच्या गजरात दाद दिली. सायंकाळी ५ वाजता” रायगडाला जेंव्हा जाग येते ” हे नाटक प्रा.डॉ.गणेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. नाटकातील कलाकारांची वेशभूषा, हावभाव अवर्णनीय होते.त्यानंतर जोगवा हा आई तुळजाभवानीवर आधारित कार्यक्रम विशाल शिंगाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केला. सायंकाळी ७ वाजता *”संस्कृती महाराष्ट्राची”* या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर करून महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजाळा देण्याचे काम केले. त्यामध्ये विविध कलाकारांनी प्रत्येक कलाप्रकार हा प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवला. याच कार्यक्रमाच्या अंतर्गत लावणी हा कलाप्रकार सादर करण्यात आला. यामध्ये सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रींनी लावणी सादर करून प्रेक्षकांना मोहित केले.लावणी या कार्यक्रमातील तसेच संस्कृती महाराष्ट्राची या कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक यांनी सादर केलेल्या विविध लावणी प्रकार होय. मानसीने सादर केलेल्या लावणीवर धाराशिवकरांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही.प्रेक्षकांना जणू मानसीच्या लावणीची भुरळच पडली. त्यामुळे धाराशीवकरांनी मानसीच्या लावणीवर टाळ्यांचा गजर करत ठेका धरला.सायंकाळच्या अतिशय प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव व साहित्यिक युवराज नळे यांची प्रमुख उपस्थिती होती.महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमाने तुळजाभवानी स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला