लातूर – “मी आज जो आहे तो शिक्षकांच्या सहकार्यामुळेच आहे. त्यामुळेच सदा सर्वकाळ शिक्षकांच्या अडी–अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन”,असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी लातूर येथे केले. दि. १९ जून २०२५ रोजी लातूर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,शंकरराव काळे अध्यापक विद्यालयाच्या सभागृहात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या (डायट) निरोप व स्वागत समारंभाचे आयोजन अधिव्याख्याता डॉ.जगन्नाथ कापसे व अधिव्याख्याता संतोष ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या समारंभात अंबाजोगाई येथे बदली झालेल्या प्राचार्या डॉ.भागीरथी गिरी यांचा सन्मान करण्यात आला तर नव नियुक्त प्राचार्य डॉ.मारुती सलगर यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होत असलेले सा.साक्षी पावनज्योतचा डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांक आ.विक्रम काळे,प्राचार्या डॉ.भागिरथी गिरी व प्राचार्य डॉ.मारुती सलगर यांना भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंबचे प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते देवून परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आ.विक्रम काळे पुढे म्हणाले, “शिक्षकांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येत नाही.म्हणूनच शिक्षकांच्या हितासाठी,त्यांच्या अडी–अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहीन”.कोणतेही काम सकारात्मकतेने केल्यासच ते सफल होते. म्हणूनच कोणत्याही गोष्टीत मी सकारात्मक दृष्टी ठेवतो”.
याप्रसंगी प्राचार्या डॉ.गिरी यांनी आपल्या कार्यकाळाचा लेखाजोखा सादर करून सहकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लातूर जिल्ह्यात दर्जेदार शिक्षणाचा पाया घालण्यासाठी सहकाऱ्यांनी दिलेले सहकार्यच आपली खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. समारंभात नव नियुक्त प्राचार्य डॉ. मारुती सलगर आपल्या स्वागताला उत्तर देताना लातूर जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा अधिक समृद्ध करण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. “डायट लातूरच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोपक्रमाच्या परंपरेला जपून अधिक व्यापक आणि समर्पक कार्य करणार आहे” असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मूल्यमापन अधिकारी प्रा.योगेश्वरी नाडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. विवेक कोरे यांनी केले. यावेळी लातूर विभागातील धाराशिव,लातूर व नांदेडच्या अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांची उपस्थिती होती.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना लातूर येथे अभिवादन
वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे फेसकॉम तर्फे सत्कार
राजर्षी शाहू महाराज जयंती समितीची बैठक लातूरात संपन्न