August 9, 2025

मारुती बनसोडे:एक परिवर्तनवादी कार्यकर्ता

  • परिस्थिती विचित्र व विदारक आहे म्हणून निष्क्रिय राहणे योग्य नाही.कारण समाजात उद्भवणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात प्रखर लढा उभारून विचित्र परिस्थितीत परिवर्तन करण्याचे सामर्थ्य हे दूरदृष्टी माणसाच्या ठिकाणी असू शकतं हे आपल्या झपाटलेपणाने सिद्ध करणारे परिवर्तनवादी व्यक्तिमत्त्व म्हणजे मारुती बनसोडे होय.आज त्यांचा वाढदिवस संपन्न होत आहे.मानव समूहात जेव्हा अज्ञान,अंधश्रद्धा, धर्मांधता व अनिष्ट रूढी प्रथा परंपरेच्या व्याधीने समाजमन काळवंडून जातं तेव्हा अशा मानव समूहाला प्रकाश वाटेवर आणण्यासाठी काळाची पाऊले ओळखावी लागतात.वंचित, दलित,बहुजन समाजाची शिक्षण संघटन व संघर्षाच्या अभावाने होणाऱ्या अपरिमीतहानीकडे लक्ष केंद्रित करण्यावर भर देणारा संघर्ष शील कार्यकर्ता म्हणून मारुती बनसोडे हे नाव फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीसाठी अधोरेखित करणारे आहे. माणसाच्या ठाई असलेल्या उदात्त नैतिक मूल्य व मानवतावाद नाकारणाऱ्या प्रस्थापित वैचारिक विद्रोह अधिक तीव्र करून वेगळ्या भूमिकेत जीवन जगणाऱ्या या प्रकाश पुत्राने पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराची पूजा बांधण्यासाठी यथाशक्ती योगदान दिले आहे.परिवर्तन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रचनात्मक कार्य करत,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ असो की शेतकरी,महिला,युवक व ग्रामीण विकासासाठी एक वेगळी पाऊलवाट निर्माण करण्यासाठी अविरत कार्य केले आहे. प्रतिकूल अशा परिस्थितीवर धाडसाने मात करून जीवनातील यशाचा सोपान सर करण्यासाठी वाटचाल करण्याचे आयुष्य केवळ यशाची च मालिका नसते तर यशाच्या सोनेरी किनाराला कधी कधी अपयश स्पर्शून जात असते.परंतु तरीही त्यांच्या जीवनाला योग्य निश्चित ध्येय असते.त्यांच प्रमाणे सामाजिक समन्वया साठी सुयोग्य संदेश देणाऱ्या या लोक चळवळीच्या व अंनिसच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित झालेला एक ध्येयवादी कार्यकर्ता म्हणजे मारुती बनसोडे.बोरगाव (तुपाचे) ता. तुळजापूर जि.धाराशिव (उस्मानाबाद ) हे त्यांचे जन्मगाव या छोट्याशा गावात जन्मलेले मारुती बनसोडे पुढे डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या चळवळीत सहभागी झाले.त्या ही आधी शिक्षण महर्षी तुळजापूर चे माजी आमदार स्व.सि.ना.आलुरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार झाले.त्यांच्यासोबत काम करू लागले. त्यानंतरच अनिस चळवळीच्या संपर्कामुळे डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या बरोबर दहा वर्षे महाराष्ट्रात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ते काम करत राहीले. ग्रामीण समाज संरचने मध्ये विकासाचा अडसर ठरत चाललेली अस्पृश्यता,अज्ञान व अंधश्रद्धा यासारख्या प्रश्नाकडे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अगदी जवळून त्यांनी पाहिले.सत्य ,आदर्श, वास्तवता व समन्वयाच्या जोरावर त्यांनी भाषण ,लेखन व आंदोलनातून घना घाती प्रहार केला .समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा त्यांच्या विरोधात उपेक्षितांच्या अपेक्षित न्यायासाठी त्यानी संघर्ष उभा केला.महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या या महान व्यक्तीशी त्यांचा संपर्क वाढत गेला.त्यामध्ये डॉ.नरेंद्र दाभोळकर,डॉ.बाबा आढाव,डॉ.श्रीराम लागू ,निळू फुले,सदाशिव अमरापुरकर, प्रा.डॉ.एन.डी.पाटील ,मेधा पाटकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल त्यांच्या शीतल सहवास,विवेकी विचारातून मारुती बनसोडे यांची वैचारिक बैठक तयार झाली.4 ऑगस्ट 1996 ला तुळजापुरात मराठवाडा पातळीवरील पोतराज प्रथम निर्मूलन निर्धार परिषद त्यांनी घेतली.या परिषदेला निळू फुले,प्रा.एन.डी.पाटील ,डॉ.नरेंद्र दाभोळकर,एकनाथ आवाड आदी मान्यवर उपस्थित होते.हे आव्हानात्मक काम करीत असताना त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले.यावर मात करण्याचं त्यांचा महत्त्व कांक्षी विचार असल्यामुळे त्यांनी या अडचणीला ही संधी मानली. त्याचा अभ्यास केला ते क्षेत्र आपल्या अभिव्यक्ती ला अनुकूल आहे की नाही याचा सांगोपांग परामर्श घेतला आणि सामाजिक कार्याला त्यांनी अधिक ताकदीने झोकून दिले.त्याकामी कार्यकर्तृत्व करण्यासाठी त्यांच्या मनातील महत्वाकांक्षा आत्मविश्वास व दृढ निश्चय त्यांना खुणावत होता .जीवनामध्ये निरनिराळे मार्ग चोखाळत चोखाळत असताना सर्वसमावेशक मार्ग तयार करण्याचे त्यांची मोठी सचोटी आजही कायम आहे प्रश्न अगदी नेमके पणाने मांडण्याची कल्पनाशक्ती त्यांच्याकडे आहे. कोणतीही समस्या असो तिचे निराकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. निराकरण करण्याची चिकाटी निष्ठा व विचाराचा योग्य ठेवा त्यांच्याकडे असल्याचे पाहायला मिळते. अगदी कठीण काळात ही धाडसाने उभारणारे मारुती बनसोडे यांनी काही कठीण काळावर ही मात केली आहे. सध्याचे युग समस्यांचे युग आहे त्यामुळे जगण्याचे संदर्भ बदलत आहे यशस्वी होण्यासाठी अनेक कौशल्य लागतात. या विचारातून सामाजिक लढ्यातुन एक पुढचे पाऊल म्हणून 1996 साली त्यांनी परिवर्तन सामाजिक संस्थेची मुहूर्त मेढ रोवली ती आता विविध प्रश्नावर काम करीत आहे . वृंदिगत होत आहे. या कार्यामध्ये अनेक चढ उतार सहन करीत असताना त्यांना संयमाचा बांध घालण्याची समयसुचकता त्यांच्या स्थानी असल्यामुळे विधायक कार्यासाठीची ऊर्जा व त्यासाठी असणारा उत्साही आज त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून येत आहे.वैचारिक लेखन प्रभावी भाषण व संशोधक दृष्टिकोन या गुणांचा ओलावा त्यांच्या ठिकाणी पहावयास मिळतो .सहज सरळ मनमिळावू अशी मैत्रीची जपणूक करणारे मारुती बनसोडे यांनी विविध विधायक प्रशिक्षणातून आपल्या ठाई असलेल्या कौशल्याने अधिक दृढ केली आहे. त्यामुळे सत्ता व संपत्ती पेक्षा योग्य संधी प्रमाणभूत मानणारे ते असल्यामुळे आगामी काळात त्यांच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होणार हे मात्र निश्चित. जीवन एक संघर्ष आहे त्यामुळे लहान मोठ्या जखमा होणारच या जखमा ना कवेत घेवून बसण्यापेक्षा त्यातून सामर्थ्य निर्माण करण्याचे काम करीत आहेत. मारुती बनसोडे यांच्या ठिकाणी असलेले सदगुण, सद्भाव, जिद्द ही त्यांची थोर मनाची साक्षीदार आहे.समाजात दडलेला शाश्वत अंधार दूर करण्यासाठी,दलित समाज उपेक्षित व विकासापासून वंचित अशा घटकांच्या सामाजिक न्यायासाठी वादळातून वाटचाल करणारा एक परिवर्तनवादी कार्यकर्ता म्हणून मारुती बनसोडे यांच्या ध्येय शक्तीला लाभलेला उदात्त,उच्च प्रतिचा सुगंध. या पुढील काळात ही अखंड दरवळत रहावा हीच सदिच्छा. त्यांच्या पुढील वाटचालीस या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
  • – – श्री.भैरवनाथ कानडे,
    जिल्हाध्यक्ष,शिक्षक भारती धाराशिव मो.नं – 9860344073
error: Content is protected !!