August 9, 2025

स्पर्धा परीक्षेतील यशाकरिता भाषेवर प्रभुत्व हवे – ॲड.राजेंद्र लातूरकर

  • लातूर – मराठी भाषा,साहित्य, वाङ्मय,अनुवाद क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधी आज उपलब्ध आहेत.कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या यशाकरिता भाषेवर प्रभुत्व मिळणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र लातूरकर यांनी केले.
    महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील मराठी भाषा, साहित्य,वाङ्मय व संस्कृती विभाग यांच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप सभारंभात “स्पर्धा परीक्षा व मराठी व्याकरण” या विषयावर साधनव्यक्ती म्हणून ते बोलत होते.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते. तर विचारपीठावर मराठी विभागप्रमुख डॉ.रत्नाकर बेडगे आणि प्रा.मारुती माळी हे उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी जगत् ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वरचित अस्मिता या भीत्तीपत्रकाच्या काव्यविशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
    पुढे बोलताना ज्येष्ठविधीज्ञ ॲड. राजेंद्र लातूरकर म्हणाले की, मराठी आता ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात नावलौकिक पावलेली भाषा आहे. शिक्षण क्षेत्र,भाषांतर क्षेत्र, पत्रकारिता,दूरदर्शन,चित्रपट संवाद कौशल्य,प्रशासन, सृजनशील लेखन,स्पर्धा परीक्षा यात महाराष्ट्रात मराठीला उच्च व महत्त्वपूर्ण स्थान आहे.भाषेचा सखोल व चिकित्सक अभ्यास केल्यास कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होणे सहज शक्य आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग यांच्या पूर्व मुख्य परीक्षेत भाषा साहित्य व्याकरण हे विषय अत्यावश्यक आहेत,असेही ते म्हणाले.
    आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.संजय गवई म्हणाले की, प्रत्येक मराठी भाषिकांनी मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा.सर्व तऱ्हेच्या व्यवहारात भाषेचा वापर अनिवार्यपणे केला जावा. भाषेविषयक अनास्था न बाळगता भाषेचा गौरव कसा वाढेल याकडे भाषिकांनी लक्ष द्यायला हवे,असेही ते म्हणाले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.रत्नाकर बेडगे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मारुती माळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सागर ठाकूर यांनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा.व्यंकट दुडिले,प्रा.शंकर भोसले,प्रा.मनीषा भुजबळ, बालाजी डावकरे,संतोष यंचेवाड, सय्यद जलील आदींनी परिश्रम घेतले.
    या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!