August 9, 2025

६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त….

  • बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर पूज्य महास्थविर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. अशोका विजयादशमीच्या दिवशी दीक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
    बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर ७ लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र डॉ.बाबासाहेबांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले म्हणून हा दिवस अशोका विजयादशमी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो.
    या घटनेला ऐतिहासिक महत्व आहे. याचा उल्लेख धम्मक्रांती दिन असा सुद्धा करतात.
    धम्मदीक्षा दिनाच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी नागपूरच्या दिक्षा भूमीवर जमत असतात. धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लाखो बौद्ध अनुयायी जमत असतात. तसेच देश –विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक यावेळी दीक्षाभूमीवर येत असतात.
    १९५७ पासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. २००६ साल हे धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्यामुळे या सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा जास्त अनुयायांची उपस्थिती राहिले होते.
    धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या २ ते ३ दिवस आगोदरच बौद्ध अनुयायी दीक्षा भूमी येथे जमतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
    दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवचन, बौद्ध दीक्षा देण्याचा सोहळा, धम्मपरिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाची सुरुवात बुद्ध वंदने पासून करण्यात येते. यानंतर दीक्षा भूमीतील बौद्ध मूर्तीला अनुयायी वंदन करतात.
    तथागत गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले. त्या पिंपळाची एक फांदी दीक्षाभूमी येथे लावण्यात आली होती. त्याचा आता मोठा पिंपळ वृक्ष झाला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करत असतात.
    अनुयायांना इथे आल्यावर मुक्तीची फिलिंग येते. हजारो वर्षांपासून जे भोगावं लागलं होते ते या दिवशी आम्ही मुक्त झालो अशी भावना असते. अनेकांना नवीन चेतना मिळते. त्रिशरण व पंचशील पाळण्याबद्दल अनुयायांना प्रोत्साहन मिळत.
    साध्या साध्या गोष्टी कानावर पडल्याने अनेकांच्या वागण्यात बोलण्यात बदल घडून येतो. सामूहिक चेतना जागृत होते. त्यामुळे लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर जमत असतात. महत्वाचं म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दीना निम्मित येणारे अनुयायी मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करतात.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली ती तारीख १४ ऑक्टोबर १९५६ होती. त्या दिवशी दसरा होता. त्यामुळे धम्म दिन १४ ऑक्टोबर रोजी साजरा करायचा की दसऱ्याला यावर अनेक वर्ष चर्चा सुरु आहे.
    बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘बुद्ध’ हा विज्ञानवादी आहे. तो प्रत्यक्ष मानवी जीवनाचा विचार करणारा आहे. तो जगाचे किंवा विश्वाचे मूळ शोधणारा नाही.
    या देशातील सामान्य माणसांच्या वाट्याला आलेले ‘दुःख’ हे सामाजिक आहे. म्हणजे या दुःखाची मुळे इथल्या समाजव्यवस्थेत आणि व्यवस्था भक्कम करणाऱ्या,टिकवून धरणाऱ्या तत्त्वव्यूहांमध्ये आहेत. ती पारलौकिकात नाहीत, लौकिकातच आहेत. परंतु, या वर्गाची/ जाती-वर्गसमूहाची सबंध मानसिकता पारलौकिकाच्या दिशेने वळवली गेली आहे. त्यामुळे हा वर्ग किंवा सामान्य माणसांचा समूह त्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखाची मुळे लौकिकात शोधत नाही, तो ती पारलौकिकात शोधतो. परिणामी, ही दुःखे नष्ट होत नाहीत, ती वाढत जातात. म्हणून कोणत्याही प्रचलित व्यवस्थेतून अशी दुःखे निर्माण होत असतील, ती वाढत असतील तर व्यवस्थापरिवर्तन हाच दुःखनिरोधाचा एकमेव मार्ग ठरतो! हे बुद्ध- फुले- मार्क्स- आंबेडकर या सर्व तत्त्ववेत्त्यांनी मान्य केले आहे.
    भगवान बुद्धाने एकूण मानवी दु:खसमस्येचा विचार केला. या विचारातूनच बुद्धदर्शन सिद्ध झाले. हे बुद्धदर्शन व्यवस्थापरिवर्तन मागणारे होते. व्यवस्थेच्या पाठीराख्यांना ते नको होते. त्यामुळे नंतरच्या काळात या दर्शनाला मानवी अस्तित्वाकडे दुःखमय दृष्टीने पाहणाऱ्या दर्शनाचे स्वरूप बहाल झाले. तेच पुढे बुद्धदर्शन म्हणून सर्वदूर प्रचलित केले गेले. मानवी अस्तित्वाकडे दुःखमय दृष्टीने पाहणारे आणि भौतिक प्रगतीला गौण स्थान देणारे बुद्धाचे असे प्रचलित दर्शन डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूळ बुद्धविचारांचा शोध घेऊन बुद्धदर्शनाची नव्याने मांडणी केली. बुद्धदर्शनाची ही मांडणी मानवाच्या प्रत्यक्ष जीवनाला आपल्या चिंतनाचे मुख्य केंद्र मानणारी आणि जगाची पुनर्रचना करू पाहणारी मांडणी आहे.
    मार्क्सनेही मानवी दुःखाचे मूळ शोधताना शोषणातून उत्पादनसंबंधांच्या क्षेत्रांत निर्माण होणारी परात्मता व त्यातून जन्मणारे दुःख व दुःखमुक्ती महत्त्वाची मानली; आणि आर्थिक-सामाजिक परिस्थितीत मानवी दुःखाचे मूळ शोधले. व्यवस्थापरिवर्तन हाच दुःखनिरोधाचा मार्ग आहे, हे मार्क्सनेही मान्य केले. म्हणून शोषणातून निर्माण होणारी परात्मता, त्यातून निर्माण होणारे दुःख हे सुद्धा सामाजिकच ठरते. म्हणजे हे दुःख समाजनिर्मित असते; आणि व्यवस्थापरिवर्तन हाच त्यावरचा उपाय असतो. म्हणूनच बुद्धाच्या ‘दुःख’ संकल्पनेचा विचार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय समाजरचनेच्या संदर्भात समाजविकास- शोषण- परात्मभाव- दुःख- व्यवस्था परिवर्तन- दुःखनिरास- पुन्हा समाजविकास या मार्क्सवादी दर्शनातील ऐतिहासिक भौतिकवादाची स्पृहनीयता महत्त्वाची व मोलाची वाटत होती. याच कारणाच्या पोटी दुःखनिरासासाठी व्यवस्थापरिवर्तन महत्त्वाचे मानताना डॉ. आंबेडकरांनी बुद्धदर्शनाची पुनर्मांडणी करतेवेळी काही मार्क्सवादी घटक त्या पुनर्मांडणीच्या चौकटीत जाणीवपूर्वक अंतर्भूत केले. फरक एवढाच, की मार्क्सची नीतीकडे बघण्याची दृष्टी ही मूल्यनिरपेक्ष होती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी ही मूल्यसापेक्ष होती. म्हणजे मार्क्सने नीतीचा विचार करताना नीतीला स्वायत्त व सार्वत्रिक मूल्य म्हणून अमान्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नीती हे स्वायत्त व सार्वत्रिक मूल्य म्हणून गरजेचे व मोलाचे वाटत होते. कारण मानव जातीच्या कल्याणाशी नीतीचा संबंध आहे, हे भान बुद्धानेही जपले, तेच भान आंबेडकरांनीही ठेवले. याच नीतितत्त्वातून ‘दुःखाचे कारण ठरणाऱ्या तृष्णेचा नाश नव्हे, तर तृष्णेचे नियमन केले जावे, आणि नव्या जगाची पुनर्रचना आकाराला यावी’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. तीच बुद्धाचीही धारणा होती. या सर्व बाबींबरोबरच बुद्धदर्शनातील प्रतीत्यसमुत्पादाचा सिद्धान्त, हेतुसामग्रीवादाचा सिद्धान्त, अनित्यतेचा सिद्धान्त, नामरूपाचा सिद्धान्त हे सर्व सिद्धान्त समजून घेत चैतन्यवादी परंपरेच्या सिद्धान्तांशी आपला कोणता संघर्ष आहे? आणि जडवादी विचारपरंपरेशी आपले कोणते नाते आहे? याचा अत्यंत गंभीर विचार करण्याची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतील लोकांवर आहे. परंतु, काही मोजके लोक सोडले तर आजमितीला बहुसंख्य लोक या जबाबदारीचा डोळसपणे विचार करताना दिसून येत नाहीत. परिणामी, दुःखनिरासासाठी अपेक्षित असणाऱ्या व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने मानवी दुःखमुक्तीची चळचळ गतिमान होताना दिसत नाही.
    प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसांची वाटणी करणारे तत्त्वज्ञान नाकारून समाजात एक समूहभाव निर्माण करणाऱ्या माणूसपणाचे मोल मान्य करणारे बुद्धाचे समतेचे तत्त्वज्ञान अंगीकारले. हे तत्त्वज्ञान मानवी समाजात व्यापक समूहभाव निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
  • नमो बुध्दाय जय भीम

 

संकलन – प्रा.अविनाश घोडके
कार्यकारी संपादक
सा.साक्षी पावनज्योत,कळंब

error: Content is protected !!