- मराठी क्रमानुसार सहाव्या आश्विन महिन्याच्या प्रथमदिनी म्हणजेच शुद्ध प्रतिपदेपासून पुढे शुद्ध दशमी पर्यंत हा महोउत्सव नवरात्री पर्यंत साजरा केला जातो म्हणून नवरात्र.
ब्रह्म विष्णू महेश यांच्या आसीम कृपेने शक्तीने अष्टभुजा रूप धारण केले आणि जगाला अनन्वित छळून त्रासदायक ठरणाऱ्या महाभयंकर महिष राक्षसाचा संहार केला, देवीला हे काम म्हणजे युद्ध करण्यासाठी नऊ दिवस लागले महिष नावाच्या राक्षसाचा नाश केल्यामुळे या देवीला महिषासुरमर्दिनी असेही म्हटले गेले.
हा उत्सव कौटुंबिक व सार्वजनिक स्वरूपात सर्व ठिकाणी साजरा केला जातो. कौटुंबिक स्वरूपात हा सण साजरा करतांना घरातील शक्ती स्वरूपात असणारी स्त्री ही आपले सर्व घर पाण्याने स्वच्छ गोमुत्राने शुद्ध व पवित्र करून घटस्थापना करते. घटस्थापना करताना प्रथम चौरंग किंवा पाठ घेऊन सुयोग्य ठिकाणी त्याची मांडणी करून त्यावर काळी माती पसरून नऊ प्रकारचे धान्य त्या मातीत मिसळले जाते. शुद्ध पाण्याचा शिडकावा करून तांब्याचा कलश विधिवत पूजेसह वर ठेवला जातो. झेंडूच्या पानाफुलांची किंवा चंदनाच्या पानाची माळ घालतात. नंदादिप प्रज्वलित केला जातो, आराधना आरती केली जाते. हा क्रम नऊ दिवस चालतो यामध्ये देवीभागवत, सप्तशती, दुर्गापाठ या ग्रंथाचे पारायण व पठण केले जाते.
सार्वजनिक स्वरूपात हा सण साजरा करताना अनेक उत्सवप्रेमी देवीभक्त एकत्रित येऊन गावात किंवा शहरात मोक्याच्या ठिकाणी दसभुजा देवीची मूर्ती सार्वजनिकरित्या पूजाअर्चा करून सिंहासनावर बसवतात. सार्वजनिक ठिकाणी बसवलेली मूर्ती ही महिषासुर राक्षसाचा वध करते आहे, दहा हातात दहा शस्त्रे आहेत, उजवा पाय राक्षसाच्या छातीवर ठेवलेला आहे एका हातातील बर्चीने राक्षसाची छाती फाडलेली आहे अशी दाखवलेली असते.
कौटुंबिक व सार्वजनिक स्वरूपात अखेरच्या दिवशी पृथ्वीवरील दुष्ट शक्तीचा प्रादुर्भाव न वाढावा व देवीची असीम कृपा जगतावर अखंड राहावी असे मागणे मागून घटाचे विसर्जन केले जाते. घटात वाढलेले अंकुर पुरुष आपल्या टोपीत घालून देवीचा आशीर्वाद घेतात.
सत्वगुणापासून महालक्ष्मी,रजो गुणांपासून शक्तीसरस्वती,तमोगुणापासून महाकालीचा उद्गम सांगितलेला आहे. देवीची सौम्य व रुद्र अशी दोन रुपे असून रौद्ररूपातील दुर्गा, महाकाली, चंडिका, दशभुजा या रूपातील देवीनेच वेळोवेळी अनेक राक्षसासह महिषासुरांचा ही नाश केलेला आहे. याचा अर्थ सबल स्त्रीशक्तीने दुर्जनाच्या दुष्ट शक्तीवर मात करून जगातील समग्र जीवमात्राला जगण्यासाठी सुखी, समाधानी व शांतीचा मार्ग निष्कंटक केला आहे असे दिसुन येते. काम ,क्रोध ,मद, मत्सर ,दंभ ,अहंकार तथा, वासना ,इच्छा, कामना , तृष्णा यांच्यावर मात म्हणजे दशहरा , दसरा होय .
- – ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ ईटकुरकर
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात