धाराशिव (जिमाका) – माहितीचा अधिकार कायदा निर्मितीपासून नागरिकांचा सन्मान होण्यास सुरुवात झाली आहे.या कायद्यामुळे जनतेला माहिती उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.त्यामुळे आवश्यक ती माहिती जनतेला उपलब्ध करुन द्यावी.मात्र,माहिती अधिकारातून मागविण्यात आलेल्या माहितीचा गैरवापर होवू नये.असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी केले आहे. यशदा पुणे आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे माहिती अधिकार कायदा यावर आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून यादव बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा यादव,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी संतोष भोर,संतोष राऊत,उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार,भूम उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील,धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव,तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे,यशदा प्रशिक्षक संपत जळके व शिवाजी पवार आदी उपस्थित होते. यादव पुढे म्हणाले की,माहितीचा अधिकार कायदयाबाबतीत कर्मचारी यांना सखोल माहिती व्हावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.तसेच हा कायदा जनतेला आवश्यक माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.समाजातील अपप्रवृत्ती या कायद्याचा गैरवापर करतांना दिसते.हा कायदा वापरताना अनेक गैरप्रकार घडतात.यासाठी कायद्यात अशा गैरप्रकारावर आळा बसविण्यासाठी दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.तसेच शासनाचे नुकसान करणाऱ्यांना आयोगाने काळया यादीत टाकावे.कर्मचारी पदभार घेतो तेव्हा काही कागदपत्रांच्या फाईल ह्या गहाळ असतात.त्याबाबत मागविलेली माहिती यावर कायद्यात काय तरतूद आहे तसेच कर्मचारी यांनी माहिती अधिकाराबाबत प्रभावी कामकाज करण्यासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रशिक्षक शिवाजी पवार यांनी कर्मचाऱ्यांना माहिती अधिकाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच संपत जळके यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.उपस्थित कर्मचाऱ्यांचा प्रश्नांना दोन्ही प्रशिक्षकांनी उत्तरे दिली. यावेळी कार्यशाळेला उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,नायब तहसीलदार,अव्वल कारकून,मंडळ अधिकारी,तलाठी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखा,जिल्हा पुरवठा कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय, धाराशिव,महसूल विभाग,नियोजन, भूसंपादन,मांजरा प्रकल्प,धाराशिव व तुळजापूर तहसील कार्यालयातील कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील