August 9, 2025

पुरस्कार ही अनंत काळाची परंपरा

  • मित्रांनो, अनंतकाळापासून पुरस्काराची परंपरा जगभर रीती-रिवाज, बाज म्हणून चालत आलेली आहे. कार्यसंपन्न, कर्तृत्ववान महिला- पुरुषांना सन्मानित करणारी, पुरस्कृत करणारी, कौतुक करणारी ही थोर परंपरा चालू होती, ती आजही चालू आहे. काळ बदलत जाईल तसतशी त्याची स्वरूपे बदलत गेलेली दिसतात.
    आपण इतिहासातील पुरावे आणि नोंदी पाहत असताना असे दिसून येते की,साहित्य,शौर्य,विद्वत्ता, वीरश्री अशा विविध अंगानी पूर्वी पुरस्कार दिल्याच्या नोंदी सापडतात. जसे पैलवान कुस्ती,तिर चालवणे, घोडा पळविणे, होळीच्या सणात अग्नीतून नारळ काढणे,लढाई जिंकणे, गड किल्ले सर करणे,युद्ध जिंकणे, गिर्यारोहण करणे,उत्कृष्ट साहित्य, कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके ई लिखाण, विविध अंगाने पूर्वी पुरस्कार दिले जायचे. कौतुक केलं जायचं. मानाप्रमाणे चांदीचं सोन्याचं कडही दिलं जायचं जहागिरी,वतनदारी दिली जायची. जसं कार्य तसा सन्मान केला जायचा.
    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासात विविध अंगाने नोंदी आपणास पहावयास मिळतात. युद्ध जिंकलं, किल्ला जिंकला की मानाची तलवार, मानाचा कडं,सैन्यातील प्रमुख पद दिले जाई. साहित्याचा विचार केला तर छत्रपती संभाजी महाराज यांनी कवी कलश यांना छन्दोगामात्य म्हणून पुरस्कृत केलं होतं.ही वर्णनीय कौतुकाची,पुरस्काराची पुरस्कृत करण्याची परंपरा जगभर रीती रिवाज म्हणून चालत आलेली दिसते.
    आधुनिक काळातील पुरस्काराचे स्वरूपही तशाच धर्तीवरती चालू असल्याचं दिसतं.शौर्य, साहित्य, पांडित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील नामवंतना सन्मानित करण्याची पवित्र परंपरा आज चालू असताना दिसते आहे. विशेष कार्य करणाऱ्यांना पाठिंबा देणे, पुरस्कृत करणे,प्रेरणा देणे, पाठबळ देणे यातून त्या व्यक्तीला बळ मिळत असते. म्हणून ही पवित्र परंपरा कैक वर्षापासून चालत आलेली आहे.
    कलियुगातील वशिल्याचे बदलणारे पुरस्काराचे स्वरूप, हल्ली डिजिटल युग पाहत असताना पुरस्काराचे पावित्र्य विस्कळीत होताना दिसत आहे. लहान सहान गोष्टींना,कार्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा अटहास लोक करताना दिसत आहेत. यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे *कमर्शियल अवार्ड* देण्याचा लोकांनी घाट घातल्याचे दिसते. त्यात पैसा कमवण्याचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. सर्वसाधारण कार्य केलं की त्याची माहिती एकत्र करतात.त्याना फोन करतात. ई-मेल पाठवतात.आणि पुरस्कारासाठी निवड झाल्याचे जाहीर करतात.हवे तर प्रत्यक्षात भेटायलाही जातील. त्याचे कोड कौतुक करतील. आणि पुरस्कार जाहीर झाल्याचं सांगूनही टाकतील.अशावेळी आपण भांबावून जातो. हा पुरस्कार अशा लोकांनी दिलाच कसा?आपण विचारायला सुरुवात केल्यानंतर मग सांगतात की आम्ही तुमचं काम पाहिलं.तुम्हाला पुरस्कार देण्याचे जाहीर झाले आहे. तुम्हाला कार्यक्रमाला यावं लागेल.आणि मग पुरस्कार कार्यक्रम खर्च म्हणून दीड दोन लाखाची रक्कम सांगून टाकतात. हप्ते पाडून देतात. आणि अर्जंट पहिला हप्ता आपल्याला भरायला सांगतात.आणि मग ते फोनचा सपाटा उठवतात. इतक्या रकमा भरायच्या आणि पुरस्कार मिळवायचा.समजा आपण इच्छा म्हणून तसा प्रयत्न केला आणि पुरस्कार मिळाला तर, जिथे आपण ती ट्रॉफी, मानपत्र ठेवनार आहोत ते ठिकाण दर्शनी असतं. म्हणजे आपण रोज त्याच्याकडे पाहणार. मग पुरस्कारच आपल्याला रोज जोडा घेऊन मागे लागेल. साला तू मला तर विकत आणला आहेस. तेव्हा आपलाच साथ आणि आपलाच घाल अशी परिस्थिती होऊन जाईल. खरं तर हे पुरस्कार स्वीकारायचे की नाही हे ज्याचे त्यानी ठरवायला हवे.
    मित्रांनो सांगण्याचा महत्त्वाचा भाग असा की पुरस्कार कोणाचा स्वीकारावा,जे लोक, व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आपल्या कार्याची नोंद घ्यावी.त्यांनी आपल्याला पुरस्कार का देतो त्याच्याबद्दल पत्र दयावे.आपली परवानगी घेऊन आपली निवड करावी. आणि सन्मानित करावे. असे पुरस्कार नक्कीच स्वीकारता येतील.तो पुरस्कार खऱ्या अर्थाने आपल्या कार्याची दखल घेऊन मिळालेला तो सन्मान असतो. नाहीतर ह्या डिजिटल युगात पत्रावळी जमा करायच्या. ओळख नसणाऱ्या लोकांच्या हातात पाया पडायचं त्याचे सीफारस पत्र जमा करायची. फॉर्म भरायचा. पैसे पाठवायचे.आणि भीक मागतो तसं संबंधिताच्या दारात उभं राहायचं.असे पुरस्कार नाकारण्याची क्षमता आपल्यात असायला पाहिजे.लाचार पुरस्काराची परंपरा झिडकारता आली पाहिजे.अशा पुरस्काराची किंमत कुठेच रहात नाही. कुटुंबात रहात नाही. समाजात राहत नाही. मग असे पुरस्कार का घ्यायचे असा प्रश्न समोर येऊन येतो. हे बदलायचं आहे. तुम्हाला, मला समाजातल्या सामाजिक बदलाचे कार्य करणाऱ्यांनी बदलायचं आहे.
    चला आपण सामाजिक बदलाच्या पवित्र परंपरेचे पाईक होऊन सामाजिक, वैज्ञानिक,शौर्य, साहित्य,कला,कौशल्य यामध्ये निपुण असणाऱ्या ज्यांनी कार्याची तपश्चर्य पूर्ण केली आहे,अशा तपस्वींना सन्मानीत करू. पुरस्कृत करू. आणि नव्या युगातील, नव्या विचाराला चालना देण्याचं समर्थन करू.
  • -समीक्षक:- भूमिपुत्र वाघ
error: Content is protected !!