August 8, 2025

ज्ञान प्रसारक मंडळातील कर्मचाऱ्यांच्या कर्तत्वाचे योग्य मूल्यमापन होते – श्रीमती सरला खोसे

  • शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री आणल्यामुळेच मुला-मुलींना शिक्षण घेता आले. शिक्षणाबरोबर नोकरीची ही संधी मिळत गेली. एकल महिलांना तर या संस्थेत कौटुंबिक आधारासोबत जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक आधार नोकरीच्या माध्यमातून मिळत गेला.
    शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी व डॉ.अशोक दादा मोहेकर यांच्या दूरदृष्टीमुळेच सरला खोसे या शिक्षिकेचा वयाच्या २३ व्या वर्षी जोडीदार दिनकर खोसे यांचा मृत्यू झाला असला तरी खचून न जाता जीवनातील प्रत्येक संकटावर मात करत आई-वडील, भाऊ-बहिण, दिर-जावांच्या मदतीने खूप मोठ्या जिद्दीने २९ वर्ष ज्ञानदानाचे खूप मोठे कार्य करून सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी मोलाचे योगदान देत मोहेकर गुरुजींच्या ज्ञान प्रसारक मंडळात शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती सरला दिनकरराव खोसे ह्या मुख्याध्यापक पदावरून ३० एप्रिल २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
    त्यानिमित्ताने कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांनी त्यांची घेतलेली प्रदिर्घ मुलाखत सा.साक्षी पावन ज्योतच्या वाचकासाठी देत आहोत.
  • प्र :- मॅडम आपलं माहेरचे आणि सासरचे नाव सांगाल का?किती भाऊ आणि बहिणी आहेत.
    ऊः- होय, माझे माहेरचे नाव सरला दादासाहेब पाटील मु.पो.देवळाली ता.भूम जि. धाराशिव आणि सासरचे नाव सरला दिनकर खोसे लोहटा (प.) ता.कळंब जिल्हा धाराशिव.मला एक भाऊ व चार बहिणी आहेत.
  • प्रः- आपले प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवीपर्यंत शिक्षण कोठे झाले?आपली जन्मतारीख किती आहे?
    ऊः- माझा जन्म देवळाली येथे दिनांक ०१.०५.१९६६ रोजी झाला. माझे प्राथमिक शिक्षण देवळालीच्या जि.प.प्रशालेत झाले.बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले तर उच्च माध्यमिक लातूरच्या शाहू महाविद्यालयात झाले.कळंब येथील ज्ञान प्रसारक महाविद्यालयात पदवी पूर्ण केली तर लातूरच्या सुशिलादेवी अध्यापक महाविद्यालयात बी.एड.पूर्ण केले.
  • प्रः- आपले लग्न केव्हा आणि कोठे झाले?
    ऊः-माझे लग्न १९८६ मध्ये पंढरपूर येथे झाले.
  • प्र:- आपण नोकरीस केंव्हा व कुठे रूजू झालात ?
    ऊ :- ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा या संस्थेच्या लेबर कॉलनी लातूर येथील श्री शिवाजी विद्यामंदिर येथे दिनांक ०१ जून १९९५ रोजी सहशिक्षिका या पदावर रुजू झाले. बारा वर्षे येथेच सेवा केल्यानंतर सन २००७ ते २०२३ या सोळा वर्षाच्या कालावधीत कळंब येथील विद्याभवन हायस्कूल येथे सहशिक्षिका आणि पर्यवेक्षिका या पदावरून काम केले. आणि कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील विद्याविकास हायस्कूल येथे दिनांक ०१-०२-२०२४ रोजी मुख्याध्यापिका या पदावर पदोन्नती झाली. आणि ३० एप्रिल २०२४ रोजी २९ वर्षे सेवा करून वयोमानानुसार शासकीय नियमाने सेवानिवृत्त होत आहे.
  • प्र :- सेवानिवृत्त होत असतानी कसं वाटतंय ?
    ऊ :- माझी मातृभाषा मराठी वर माझे खूप प्रेम असल्याने, मराठी विषयाचे अध्यापन करण्याची संधी ज्येष्ठत्वा नुसार जात असल्याने खूप वाईट वाटतंय.
  • प्र :- आजतागायत च्या आयुष्यातील आपला दुःखद प्रसंग कोणता?त्यातून सावरण्यासाठी कोणाची प्रेरणा मिळाली?
    ऊ – माझ्या वयाच्या तेवीसाव्या वर्षीच माझा जीवनसाथी मला एकटीलाच सोडून गेला.अर्थात त्यांचे १६ जून १९९० रोजी दुःखद निधन झाले.हा खूप मोठा आघात माझा मनावर झाला. परंतु मला या दुःखद घटनेतून सावरण्याचे बळ माझे दीर भास्कर दादा,वडील दादासाहेब, भाऊ धनंजय पाटील,नणंद, भावजयी, जाऊ बाईंनी आणि माझ्या नातेवाईकांनी दिले.माझा एकलपणा घालवण्यासाठी आणि पुढील आयुष्याला दिशा देण्यासाठी दिर भास्कर दादांनी माझ्या शिक्षणाच्या जोरावर डॉ.अशोक दादांच्या कृपा आशीर्वादाने मला संस्थेत नोकरी देऊन मला जीवन जगण्याचे बळ दिले.
  • प्र – आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण कोणता?
  • उ:- मला नातीच्या रूपाने दिनांक २९-०३-२०१२ ला श्रीशा घरात आली. तेंव्हा खूप आनंद झाला होता. नंतर ०२ जून २०१७ ला शाईशा ही दुसरी नात घरात आली.
  • प्र :- आपल्या कुटुंबाविषयी थोडं सांगाल का?
    उ:- होय…नक्कीच… दिनांक २१-१०-१९८९ रोजी माझ्या पोटी एका रत्नाचा जन्म झाला.त्याचे नाव रणजित आहे.पिंपळगाव (कोठावळा) येथील प्रभावती नारायण वैद्य यांच्या प्रणिती या मुलीसी दिनांक १८ जून २०१० रोजी लग्न झाले.त्यांना दोन मुली श्रीशा आणि साईशा असून सून प्रणिता शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी करत आहे. नात्याच्या कुटुंबापेक्षाही मी संस्थेच्या कुटुंबात जास्त रमले आहे. कारण आमची संस्था कुटुंबापेक्षा जास्त एकमेकांच्या दुःखात सहभागी होते.आदरणीय डॉ.अशोक दादां विषयी कसल्या प्रकारचे दडपण न येता आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो.संस्थेचा प्रत्येक कर्मचारी संस्था नसून कुटुंबाप्रमाणे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो आणि त्याच्या कर्तत्वाचे योग्य मूल्यमापन केले जाते हा माझा अनुभव आहे.
  • प्र :- सेवानिवृत्तीनंतर काय संकल्प आहे?
    ऊ :- सेवानिवृत्तीनंतर मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हिरारीने भाग घेऊन सामाजिक अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणार आहे.
  • प्र :- आता शेवटचा प्रश्न असा की, आपण आपल्या सहकाऱ्यांना व विद्यार्थ्यांना काय संदेश देणार?
    ऊ:- माझे सर्व सहकारी उच्च विद्याविभुषित असल्याने मी त्यांना संदेश देणे म्हणजे आकाशाला गवसणी घालणे असं काहीतरी होईल तरीही आपण आग्रह करताय म्हणून त्यांनी आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आणि जागरुकता बाळगून नव्या पिढीचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी आध्यात्मिक संस्काराची जोड देऊन सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी कटिबद्ध राहावे आणि विद्यार्थ्यांनी आजच्या अँड्रॉइड फोनच्या युगात वावरत असतानी वाचन संस्कृती लुप्त न होऊ देता वाचाल तर वाचाल हे ध्यानात ठेवावे.
  • — समाप्त —

मुलाखतदार – प्रा.अविनाश घोडके

error: Content is protected !!