धारशिव (जयनारायण दरक) – सतत उद्भवनारी व दूष्काळी दाहकता त्यावर मात करुन कूटूंबाची आर्थिक उन्नती व उदरनिर्वाह भागवणे जिकीरेचे होत आहे.या वर्षी ही मोठया संकटाचा सामना शेतकरी करताना दिसून येत आहे. परंतू संघर्षातून समृद्धी शोधणारे शेतकरीही आहेत याची अनुभूती कळंब तालुक्यातील शिराढोण येथील युवा शेतकरी राहूल कल्याणराव पाटील यांनी उभारलेला शेतीपुरक दुग्ध व्यवसाय प्रकल्प पाहिल्यास येते. पंधरा मुर्रा म्हशींच्या संगोपनातून वर्षाला 15 लाखांचे उत्पन्न मिळवणा-या या युवा शेतक-याची हि यशोगाथा. शिराढोण येथील युवा शेतकरी राहूल पाटील यांना 5 एकर शेती आहे. सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांना शेतीपुरक व्यवसाय करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करण्याची तयारी होतीच परंतू मार्ग मिळत नव्हता. पाटील यांनी 2018 साली दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरवले. परंतू हा व्यवसाय करण्यासाठी केवळ एक म्हैस खरेदीसाठी सुध्दा त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते परंतू जिद्दीने हा व्यावसाय सुरु करायचा या इच्छाशक्तीने त्यांनी उसनवारी करुन एक दुधाळ म्हैस खरेदी केली. त्यानंतर त्यांना दुध विक्रीतून पैसे मिळू लागले. हा व्यवसाय पुढे नेत त्यांनी आज रोजी त्यांच्या शेतात 15 म्हशींचा मोठा प्रकल्प उभा केला आहे. कर्जाऊ रक्कम घेत त्यांनी या शेतीपुरक व्यवसायात 25 लाख रुपये गुंतवणूक केली आहे व त्याची फलप्राप्ती त्यांना या व्यावसायातून वार्षीक 15 लाखांचे उत्पन्न मिळत आहे. हा शेतीपुरक दुग्ध व्यवसायासाठी राहूल यांना त्यांचे बंधू रणजीत व संजय पाटील यांची मोठी मदत होते. या प्रकल्पासाठी चारा व्यवस्थापनासाठी तसेच म्हैस संगोपन करण्यासाठी अद्यावत स्लॅबचा गोठा त्यांनी तयार केला आहे. या मिळत असलेल्या 15 लाख उत्पन्नातून म्हशींच्या संगोपनासाठी त्यांचा 5 ते 6 लाख रुपये खर्च होतो. या दुग्ध व्यवसायात त्यांना सकाळी व संध्याकाळी असे मिळून 130 लिटर दुध निघते. या दुधाची विक्री राहूल हे स्वतः ग्राहकांच्या घरी पोहच करतात. दुष्काळ व बेरोजगारीने कंटाळलेल्या युवकांसाठी पाटील यांनी उभारलेला हा प्रकल्प निश्चीत प्रेरणादायी आहे. वेगळी ओळख निर्माण झाली – दुधवाले काका आले.. युवा शेतकरी राहूल हे गावातील 150 कूटूंबाना दुध पोहचवतात. सकाळी प्रत्येक कूटूंबातील लहान मुले त्यांची वाट बघत बसतात. घरा समोर येताच गाडीचा हाॅर्न वाजला की घरातील बाल गोपाळांचा एकच कलकलाट आले आले दुधवाले काका आले. या दुग्ध व्यवसायातून पाटील यांची आर्थिक उन्नतीतर झालीच परंतू एक वेगळी ओळखही या व्यावसायातून त्यांना प्राप्त झाली. वर्षाला 3 लाखांचे शेणखत: पाटील यांनी उभारलेल्या या शेतीपुरक दुग्धव्यावसाय प्रकल्पातून शेणखत निर्मीतीही मोठया प्रमाणात होते. दरवर्षी शेणखत विक्रीतून त्यांना 3 लाखांचे उत्पन्न मिळते. शेणखत तयार होण्या आगोदरच वर्षभरापासून शेतकरी त्यांच्याकडे या शेणखताची बूकींग करुन ठेवतात. स्वतःची शेती संपूर्ण सेंद्रीय पध्दतीने:राहूल पाटील यांना असलेल्या 5 एकर शेतात त्यांनी हा दुग्ध व्यवसाय सूरु केल्यापासून कसलेही रासायणी खत वापरले नाही. त्यांच्या शेतात पिकणाऱ्या प्रत्येक पिकास ते सेंद्रिय खतच वापरतात त्यामूळे त्याच्या शेतातील गहू , ज्वारी आदी धान्यास परीसरात मोठी मागणी आहे. तसेच म्हशींच्या खाद्यासाठी मका, घास हे सुध्दा सेंद्रीय पध्दतीनेच लागवड केल्याने संपूर्ण शेती हि विषमुक्त झाली आहे.
More Stories
‘दैनिक लोकमत’ समूहातर्फे शिराढोण येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न आला.
खर्च वाचला तर आत्महत्या थांबतील – सत्यपाल महाराज
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर