धाराशिव (जिमाका) – केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. या योजनांच्या लाभामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येते. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी विविध यंत्रणांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. असे निर्देश केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव तथा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या प्रभारी अधिकारी प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा आढावा घेतांना श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा उपनिबंधक सुनिल शिरपूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरीदास यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या, जिल्ह्यातील नागरीकांसाठी आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. महिलांची वेळोवेळी हिमोग्लोबीन तपासणी करावी. आवश्यकता असल्यास त्यांना लोहयुक्त गोळ्या द्याव्यात. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा या केंद्रातून उपलब्ध झाली पाहिजे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमांतून गर्भवती महिला व स्तनदा माता तसेच जे बालके कुपोषीत आहेत त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी पोषण आहार देण्यात यावा. मुलांचा गणित या विषयात पाया कच्चा असतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आनंददायी पध्दतीने गणिताचे शिक्षण द्यावे. त्यामुळे बालके शाळाबाह्य राहणार नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध उपक्रम राबवावे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. मुलींच्या जन्माचे स्वागत करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात क्षयरुग्णांचा शोध घेवून त्यांच्यावर वेळीच उपचार करावे असे सांगून श्रीमती वर्मा म्हणाल्या, केंद्र सरकारच्या विमाविषयक विविध योजना आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा. या विमा योजनेतून पात्र लाभार्थी वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात ड्रोनद्वारे शेतात पिकांवर फवारणी करण्याचे नियोजन करावे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करुन द्यावे. त्यामुळे कमी वेळात फवारणीची कामे पूर्ण होतील. जिल्ह्यात असलेल्या तलावातील गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकून उत्पादकता वाढविण्यासाठी गाळाचा उपयोग करुन घ्यावा. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमांतून शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन द्यावे. असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी आर्थिक समावेशन व कौशल्य विकासचा देखील आढावा घेतला. ओम्बासे म्हणाले, सन 2053 पर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेता नळजोडणीद्वारे ग्रामीण भागातील कुटूंबांना शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात यंत्रणामार्फत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यात या योजनांची मदत होणार आहे. नीति आयोगाकडून वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग नियोजनातून खर्च करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या वतीने जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. जिल्हा नियोजन अधिकारी झाडे यांनी जिल्ह्यात आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. सभेला विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यांची उपस्थिती होती
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले