धाराशिव – गॅस टंचाई व दरवाढीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून अनोखे आंदोलन करण्यात आले. राज्यभर निर्माण झालेल्या गॅस तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान “नरेंद्र,कब मिलेगा सिलेंडर?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गॅस टंचाईमुळे घरगुती गॅस शेगड्या थंड पडल्या असून चहाच्या टपऱ्या,रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स आणि हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्याचे चित्र आहे.अनेक कुटुंबांना पुन्हा कोळसा व लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. दि.११ मार्च रोजी ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला इशारा आता प्रत्यक्षात उतरत असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी सरकारवर टीका केली.मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांसह केटरिंग व्यवसाय, एलपीजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि पेट्रोकेमिकल्स उद्योगांवर या टंचाईचा गंभीर परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे आंदोलन जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.यावेळी निवासी जिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांना महिलांनी चुलीवर तयार केलेली भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा देत प्रतिकात्मक निषेध नोंदवला. आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे, युवा आघाडीचे शितल चव्हाण, कामगार आघाडीचे सुधीर वाघमारे,डॉ.अनंत देडगे,विजय बनसोडे,नासीर शेख,बाबासाहेब कांबळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान,गॅस टंचाईचा प्रश्न तातडीने सोडवला नाही,तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
More Stories
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह:विविध उपक्रम
श्रद्धेला प्रश्न विचारणे हेही मूलभूत कर्तव्य — ॲड.असीम सरोदे
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण