April 8, 2026

कळंबमध्ये ‘काव्य मैफिल’ व विज्ञानाधारित चमत्कार सादरीकरण;अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा उपक्रम

  • कळंब – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,शाखा कळंब यांच्या वतीने १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता जगछाया नर्सिंग होम येथे “काव्य मैफिल व चमत्कार सादरीकरण” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
    या कार्यक्रमात दोन भागांत सादरीकरण होणार आहे.पहिल्या भागात कवी व कवयित्री आपल्या कवितांमधून सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणार आहेत. कळंब परिसरातील सर्व कवी व कवयित्रींनी या काव्य मैफिलीत सहभागी व्हावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.सहभागी कवी-कवयित्रींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
    कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात विज्ञानावर आधारित ‘चमत्कार सादरीकरण’ होणार असून हनुमंत भोसले हे विविध प्रयोगांच्या माध्यमातून तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून दाखवणार आहेत. बुवाबाजी,अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतींना छेद देत प्रेक्षकांना वैज्ञानिक विचारांची ओळख करून देणे हा या सादरीकरणाचा मुख्य हेतू आहे.
    आजच्या युगात विज्ञाननिष्ठ विचारसरणी विकसित होणे अत्यंत आवश्यक असल्याने अशा उपक्रमांची गरज अधोरेखित होत आहे.या कार्यक्रमातून नागरिकांना अंधश्रद्धेच्या अंधारातून बाहेर काढून विवेकवादी समाज घडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
    आयोजकांनी नागरिकांनी तसेच विद्यार्थी,युवक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले आहे.
error: Content is protected !!