कळंब–विद्याभवन हायस्कूल,कळंब येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कुणाल महिंद्र जगताप याने सैनिक स्कूल,सातारा येथे निवड मिळवून आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक कार्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. अत्यंत शांत,संयमी आणि अभ्यासू स्वभावाचा कुणाल हा लहान वयातच मोठे ध्येय बाळगणारा विद्यार्थी आहे.त्याने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून प्रेरणा घेत शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि ज्ञानाची ओढ यामुळे त्याने सातत्याने अभ्यास करून सैनिक स्कूलच्या कठीण निवड प्रक्रियेत यश मिळवले. विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला केवळ वैयक्तिक प्रगतीचे साधन न मानता ते सामाजिक समतेचे आणि स्वाभिमानाचे भक्कम आधारस्तंभ मानले.त्यांनी विद्यार्थ्यांना विचारशक्ती विकसित करण्याचे,प्रश्न विचारण्याचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.“मनुष्याने मोठे व्हायचे असेल,तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही,”हा त्यांचा ठाम संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे.याच विचारसरणीचा प्रभाव कुणालच्या यशामध्ये स्पष्टपणे दिसून येतो. या उल्लेखनीय यशाबद्दल सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुभाष लाटे,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुणालचे कौतुक केले.कुणालच्या यशात त्याच्या वर्गशिक्षिका बालिका गाडेकर यांचे मार्गदर्शन व आई सौ.सुवर्णा महेंद्र जगताप यांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. याप्रसंगी कुणालची आई सौ.सुवर्णा महेंद्र जगताप म्हणाल्या की,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचा अंगीकार केल्यास कोणताही विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो.कुणालचे यश हे चिकाटी,परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांचे उत्तम उदाहरण आहे.इतर विद्यार्थ्यांनीही त्याचा आदर्श घेऊन प्रगती साधावी. कुणाल जगतापच्या या यशामुळे विद्याभवन हायस्कूलचा नावलौकिक आणखी वृद्धिंगत झाला असून,भविष्यात अशाच अनेक यशस्वी विद्यार्थ्यांची परंपरा कायम राहील,असा विश्वास व्यक्त होत आहे.
More Stories
कळंबमध्ये ‘काव्य मैफिल’ व विज्ञानाधारित चमत्कार सादरीकरण;अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा उपक्रम
कौशल्याधिष्ठित शिक्षण हीच काळाची गरज – डॉ.अशोकराव मोहेकर
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी अभिजीत जाधव तर उपाध्यक्षपदी यश बनसोडे