April 3, 2026

येडेश्वरी यात्रेत शिवसेनेचा सेवाभाव;अजित पिंगळे यांच्या पुढाकारातून भव्य महाअन्नदान

  • येरमाळा – धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांतून आलेल्या भाविकांनी येरमाळा येथे हजेरी लावत देवीचे दर्शन घेतले. यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता.
    यात्रेदरम्यान भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्या वतीने यंदाही भव्य महाअन्नदानाचे आयोजन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम यावर्षीही अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला.
    या महाअन्नदान उपक्रमात तब्बल १२०० किलो खिचडीचे वाटप करण्यात आले. यात्रेसाठी दूरदूरून आलेल्या भाविकांना गरम, ताजे व स्वच्छ अन्न मिळावे यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. दिवसभर चाललेल्या या अन्नदान सेवेत हजारो भाविकांनी लाभ घेत समाधान व्यक्त केले.
    या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कळंब व धाराशिव तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्वयंपाक, वितरण, नियोजन आणि व्यवस्थापन या सर्व बाबी शिवसैनिकांनी समन्वयाने पार पाडल्यामुळे कार्यक्रम अत्यंत सुरळीतपणे पार पडला.
    “अन्नदान हेच श्रेष्ठ दान” या भारतीय संस्कृतीतील मूल्याची जपणूक करत अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हा सेवाभावी उपक्रम दरवर्षी राबवला जातो. या उपक्रमामुळे यात्रेत सहभागी होणाऱ्या गरजू व दूरवरून आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे.
    या उपक्रमाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. तसेच अशा सेवाभावी कार्यामुळे यात्रेचे धार्मिकच नव्हे तर सामाजिक महत्त्वही अधिक अधोरेखित होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
error: Content is protected !!