लातूर (दिलीप आदमाने) – समाजहितासाठी गेली तीन दशके अविरत झटणारे ज्येष्ठ समाजसेवक तात्यासाहेब सोनवणे यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होत असून त्यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा रविवार,दि.२९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनच्या वतीने समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो.तात्यासाहेब सोनवणे यांनी साहित्य, सामाजिक कार्य,वैद्यकीय मदत आणि जनजागृती या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. गेल्या ३० वर्षांपासून ते समाजसेवेच्या विविध उपक्रमांत सक्रिय असून त्यांच्या कार्याचा प्रभाव व्यापक पातळीवर जाणवतो. साहित्य क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे.‘जागल्या’,‘शाळा उपेक्षेची’ या कवितासंग्रहांसह ‘वैद्यकीय मदत व माहितीचा अधिकार’ या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे.तसेच कोरोना काळात ‘लढाई कोरोनाशी’ कोविड-१९ विशेषांक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘मुक्तीदाता’ विशेषांक प्रकाशित करून त्यांनी सामाजिक जागरूकता निर्माण केली. तात्यासाहेब सोनवणे यांना यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’, नवी दिल्ली येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप’, ‘शाहू-फुले-आंबेडकर समाजसेवक पुरस्कार’ (औरंगाबाद), ‘जगदीश खेबुडकर पुरस्कार’ (पुणे) तसेच विविध सामाजिक संस्थांकडून ‘कोरोना योद्धा’ अशा सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनचे विश्वस्त सुफी सय्यद समसोद्दीन यांनी सांगितले की,स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि धैर्यपूर्ण विचारांपासून प्रेरित हा पुरस्कार समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो. तात्यासाहेब सोनवणे हे नेताजींच्या विचारांचा अभ्यासक असून ते हा वैचारिक वारसा जपण्याचे कार्य करत आहेत. या पुरस्कारात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि मानपत्र यांचा समावेश असून सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य,पर्यावरण, पत्रकारिता,कृषी आणि सार्वजनिक सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे समाजातील प्रेरणादायी कार्याला योग्य व्यासपीठ मिळणार असून युवकांमध्ये राष्ट्रसेवेची प्रेरणा निर्माण होईल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
More Stories
कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच
“जगाला युद्धाची नव्हे,बुद्धाची गरज” – बौद्धाचार्य सुनील गायकवाड
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान