सोनपेठ – परभणी जिल्ह्यात भीम आर्मी भारत एकता मिशनच्या संघटन विस्ताराला वेग देत शेळगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे अनावरण उत्साहात पार पडले.विशेष म्हणजे या शाखा अनावरणाचा मान महाराष्ट्र प्रदेश संघटक विनोद कोल्हे यांनी गावातील महिलांना देत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग तसेच महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी नुकतीच विनोद कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक म्हणून नियुक्ती केली आहे.त्याचबरोबर नांदेड,हिंगोली, परभणी आणि जालना या चार जिल्ह्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २६ मार्च २०२६ रोजी सोनपेठ तालुक्यात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत जिल्ह्यात संघटन विस्तार अधिक गतीने करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. “गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे पदाधिकारी” ही संकल्पना राबवून प्रत्येक गावात भीम आर्मीची मजबूत उभारणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर शेळगाव येथे परभणी जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करून संघटनेने महिलांच्या सहभागाला प्राधान्य देत सामाजिक समतेचा संदेश दिला. यावेळी बोलताना विनोद कोल्हे यांनी भीम आर्मी ही देशातील दलित,बहुजन,शेतकरी आणि वंचित घटकांचा बुलंद आवाज असल्याचे सांगितले.खासदार भाई चंद्रशेखर आजाद संसदेत प्रत्येक घटकाचा प्रश्न प्रभावीपणे मांडत असल्याचे त्यांनी नमूद केले. “आपण सर्वांनी भीम आर्मीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून संघटन अधिक बळकट करावे,” असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यक्रमाला परभणी जिल्हा प्रमुख चंद्रशेखर बनसोडे, उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सरवदे, शहाजी नवगिरे, जिल्हा सचिव अमोल वाघमारे, परभणी तालुका अध्यक्ष गोविंद वाघमारे, गंगाखेड तालुका अध्यक्ष आकाश पारवे, सोनपेठ तालुका अध्यक्ष नितीन वावळे, उपाध्यक्ष प्रकाश गोदाम, संघटक सिद्धेश्वर गायकवाड, शहराध्यक्ष विशाल शेंडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे परभणी जिल्ह्यात भीम आर्मीच्या संघटनात्मक बळकटीला नवे बळ मिळणार असून सामाजिक चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
More Stories
श्री शिवाजी विधी महाविद्यालय,परभणी येथे संविधान दिन उत्साहात साजरा
मार्च अखेर जिल्हा वार्षिक योजनेचा निधी पूर्ण खर्च होणार
सामाजिक न्याय विभागाचे सन २०२३-२४ चे विविध पुरस्कारासाठी मागविले अर्ज