March 27, 2026

कळंब बाजार समितीचे ४६ गाळे फक्त खुल्या लिलावातूनच

  • कळंब– कृषि उत्पन्न बाजार समिती कळंबच्या ४६ गाळ्यांच्या वाटपासंदर्भात पसरविण्यात येणाऱ्या अफवा पूर्णपणे निराधार असून समितीचा कारभार पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीनेच सुरू असल्याचे स्पष्ट करत सभापती शिवाजी कापसे यांनी आज पत्रकार परिषदेत ठाम भूमिका मांडली.कोणताही गाळा अद्याप कुणालाही परस्पर वाटप करण्यात आलेला नसून सर्व गाळे केवळ खुल्या लिलाव प्रक्रियेद्वारेच दिले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
    दि.२१ मार्च २०२६ रोजी काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनंतर निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या वतीने हा अधिकृत खुलासा करण्यात आला.समिती गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ व शिस्तबद्ध कारभारासाठी ओळखली जात असून संचालक मंडळाच्या सहकार्याने तब्बल ७० वर्षांचा प्रलंबित बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती कापसे यांनी दिली.
    मुख्य बाजार आवारात ‘स्वारस्य अभिव्यक्ती’ (EOI) या संकल्पनेअंतर्गत ४६ गाळ्यांच्या बांधकामाचा प्रस्ताव पणन संचालक,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला होता.या प्रस्तावास दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी अटींसह मान्यता मिळाली होती.मात्र, त्यानंतर निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे गाळे वाटपाच्या जाहिरात प्रक्रियेला विलंब झाला.
    आचारसंहिता संपल्यानंतर दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी दै. पुढारी व लोकमत टाइम्समध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि दि.२८ फेब्रुवारी रोजी लिलावाचे नियोजन करण्यात आले होते.परंतु व्यापारी व इच्छुकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा लिलाव रद्द करण्यात आला.
    आता फेरलिलाव व नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचा विषय येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यासाठी दि.१८ मार्च २०२६ रोजी सभा नोटीसही जारी करण्यात आली आहे.त्यामुळे गाळे परस्पर वाटप झाल्याच्या बातम्या केवळ दिशाभूल करणाऱ्या असल्याचे कापसे यांनी ठामपणे स्पष्ट केले.
    दरम्यान,‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ योजनेअंतर्गत शेतकरी भवन व गाळ्यांच्या बांधकामाला अंतिम टप्प्यात मंजुरी मिळत आहे. याशिवाय बाजार समिती परिसरात सुमारे ३ कोटी ७२ लाख रुपयांच्या रस्ते विकास कामांना गती देण्यात येत असून, विद्युत तारामुक्त परिसर, वृक्षलागवड आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांवरही भर दिला जात आहे.
    बाजार समितीने परवाना घेऊनही कोणताही व्यवसाय न करणाऱ्या किंवा गाळा व भूखंड नसलेल्या सुमारे ४०० परवान्यांची रद्द प्रक्रिया हाती घेतली आहे. विशेष म्हणजे कोणतेही कर्ज न घेता समितीचा कारभार सक्षमपणे चालवला जात असून गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सुमारे ८० लाख रुपयांची उत्पन्नवाढ नोंदवली गेली आहे.
    उपसभापती श्रीधर भवर तसेच सर्व संचालकांच्या सहकार्यामुळे बाजार समिती विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे सभापती शिवाजी कापसे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला कळंब तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!