March 25, 2026

गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा

  • गोविंदपूर (अविनाश सावंत) – जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “गुढीपाडवा प्रवेश वाढवा” अभियानाला गोविंदपूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये तब्बल ३१ नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
    या उपक्रमामागील मुख्य उद्देश “एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये” हा असून, त्यासाठी शिक्षक व शाळा प्रशासनाने गावपातळीवर जनजागृती करून पालकांशी संवाद साधला.परिणामी, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचा शाळेत प्रवेश निश्चित केला.
    प्रवेशोत्सवाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक हनमंलू कनकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात केले.यावेळी शिक्षक गोविंद गोरे,संजय भालेराव,वसंत इंगळे,गणपत तपिसे तसेच शिक्षिका मंजुषा घोळवे,मनिषा कदम,अनिता आनेराव,वैशाली बांगर,पौर्णिमा मुधोळकर,विष्णू मुंडे आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    नवीन विद्यार्थ्यांचे फुले,टॉफी व स्वागतपर उपक्रमांद्वारे आनंदात स्वागत करण्यात आले.या उपक्रमामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्सुकता वाढल्याचे दिसून आले.
    गोविंदपूर येथील या यशस्वी उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत असून,भविष्यातही अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांची संख्या वाढेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
error: Content is protected !!