March 21, 2026

कळंबमध्ये अंनिसचा महिला शक्तीचा उत्सव;स्पर्धा,सन्मान आणि मार्गदर्शनाने ‘महिला दिन’ संस्मरणीय

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा)– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) शाखा कळंब यांच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त आयोजित विविध स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.द्वारका नगरी येथील मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    महिलांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने रांगोळी,पाककला आणि ‘संगीत खुर्ची’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.रंगीबेरंगी रांगोळ्यांमधून सृजनशीलता, पाककला स्पर्धेतून चव आणि सादरीकरण तर संगीत खुर्ची स्पर्धेतून उत्साह आणि स्पर्धात्मकता दिसून आली.
    या कार्यक्रमासाठी ‘फ्रीडम फाउंडेशन’धाराशिवच्या अध्यक्षा व मानवी हक्क कार्यकर्त्या ॲड. झीनत प्रधान या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी आपल्या मनोगतातून महिला सक्षमीकरणाचे महत्त्व,स्त्रियांचे हक्क आणि समाजातील त्यांच्या भूमिकेवर मार्गदर्शन केले. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिस धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे होते. तसेच कळंब कार्याध्यक्ष किसन लोंढे,प्रधान सचिव प्राजक्ता पाटील,विश्वनाथ सावंत,महिला सहभाग विभागाच्या प्रा.वर्षा सरवदे,अध्यक्ष प्रतिभा भंवर, अनिता खंडागळे,धनंजय डोळस आणि प्रा.अर्चना मुखेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    मान्यवरांच्या शुभहस्ते स्पर्धांमधील विजेत्या महिलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:
    • पाककला स्पर्धा : प्रथम – महिमा कुपकर,द्वितीय – राजकन्या बडे,तृतीय – शैला डोळस
    •रांगोळी स्पर्धा : प्रथम – सीमा जोगदंड,द्वितीय – प्रतिभा सावंत
    • संगीत खुर्ची : प्रथम –आशा मुळी,द्वितीय – सरस्वती लोंढे, तृतीय – शीतल शिंदे
    या स्पर्धांसाठी सुनिता चव्हाण, कल्पना हुलसुरकर आणि जयश्री जाधव यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंनिस कळंब शाखेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.तसेच राजेश ट्रेडर्स, सुंदर गिफ्ट अँड एम्पोरियम, भैरवनाथ बॅटरीज आणि गायत्री ब्युटी पार्लर यांनी प्रायोजकत्व देऊन मोलाचे सहकार्य केले. आयोजकांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
    या उपक्रमामुळे महिलांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळालीच,शिवाय आत्मविश्वास वाढीस लागून सामाजिक सहभाग अधिक बळकट झाल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!