March 21, 2026

कळंबमध्ये ध्वज दिंडीचे जल्लोषात स्वागत;शंभू महादेव यात्रेसाठी भक्तांची भावपूर्ण पायी वाटचाल

  • कळंब (माधवसिंग राजपूत) – श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या चैत्री एकादशी यात्रेनिमित्त निघालेल्या ध्वज दिंडीचे कळंब शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.टाळ,मृदंग आणि सनईच्या गजरात शहरातून मिरवणूक काढत शिवभक्तांनी मानाच्या ध्वजाचे दर्शन घेतले.
    या यात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शंभू महादेव व माता पार्वती यांच्या विवाह सोहळ्यासाठी वापरण्यात येणारा पारंपरिक शेलापागोटा.हा शेलापागोटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार तयार केला जातो. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हा शेलापागोटा मंदिराच्या शिखरावर बांधला जातो,ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे.
    बीड जिल्ह्यातील आवसगाव येथील महादेव भक्त दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी कळंब येथे मुक्काम करतात.यावर्षी १७ मार्च रोजी आवसगाव येथून निघालेली ही ध्वज दिंडी १९ मार्च रोजी कळंब येथे दाखल झाली. चोंदे गल्लीतील प्रकाश उर्फ धोंडीराम (नाना) चोंदे यांच्या घरासमोर मानाची ध्वजा दर्शनासाठी थांबवण्यात आली होती.त्यांच्या वतीने ध्वजधारक व भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
    दर्शन व भोजनानंतर दिंडीतील मानकरी देवी मंदिर येथे मुक्कामी थांबले आणि पहाटे पुन्हा श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरच्या दिशेने प्रस्थान केले.
    ही मानाची ध्वजा आवसगाव येथील कै. संभाजी सदाशिव ध्वजकरी यांच्या कुटुंबाकडे परंपरेने चालत आली आहे. त्यांच्या पश्चात कै.शशिकुमार संभाजी ध्वजकरी यांनी ही परंपरा जोपासली.सध्या त्यांच्या अल्पवयीन मुलांमुळे त्यांचे मामा राजाभाऊ ताटे महाराज (बीड) गेल्या पाच वर्षांपासून ही परंपरा पायी दिंडीद्वारे पुढे नेत आहेत.
    या दिंडीमध्ये महादेव शिनगारे, सुधाकर शेळके,अशोक शिंदे, विजय मानकूस यांसारखे शिवभक्त सहभागी झाले आहेत.
    दरम्यान,२६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शेलापागोटा बांधण्याचा विधी पार पडणार असून रात्री १२ वाजता शंभू महादेव व माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तर २८ मार्च रोजी चैत्री एकादशीला भव्य यात्रा भरत असून राज्यभरातून हजारो भाविक कावड व ध्वज घेऊन या उत्सवात सहभागी होणार आहेत.
error: Content is protected !!