March 21, 2026

साक्षी पावनज्योत वृत्तपत्र देऊन सन्मान;शिपाई ते प्रबंधक प्रवासाचा गौरव सोहळा

  • कळंब (अविनाश घोडके) – नव्या सुरुवातीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा च्या शुभमुहूर्तावर एका कर्मचाऱ्याच्या ३३ वर्षांच्या कष्टमय आणि जिद्दीच्या प्रवासाला उजाळा देत त्यांचा गौरव करण्यात आला. शिपाई पदावरून सुरुवात करून कार्यालयीन ‘प्रबंधक’ (रजिस्टर) पदापर्यंत मजल मारणारे हनुमंत अच्युतराव जाधव यांची ही वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
    सन १९९३ मध्ये अत्यंत साध्या शिपाई पदावर रुजू झालेल्या जाधव यांनी प्रामाणिकपणा,मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आपली वेगळी ओळख निर्माण केली.सुरुवातीच्या काळात मर्यादित साधने,आर्थिक अडचणी आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या यांचा सामना करत त्यांनी कामात सातत्य राखले.प्रत्येक जबाबदारी त्यांनी मनापासून पार पाडली,त्यामुळे त्यांच्यावर वरिष्ठांचा विश्वास वाढत गेला.
    नोकरी करत असतानाच त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. दिवसभर काम आणि त्यानंतर अभ्यास अशी कसरत करत त्यांनी आपल्या जिद्दीने शिक्षणाची वाटही यशस्वीपणे पार केली. या परिश्रमांचे फळ म्हणून त्यांना वेळोवेळी पदोन्नती मिळत गेली आणि अखेर त्यांनी ‘प्रबंधक’ या जबाबदारीच्या पदावर झेप घेतली.
    दि.२० मार्च २०२५ वार शुक्रवार रोजी कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात त्यांच्या पदोन्नतीनिमित्त सत्कार समारंभ पार पडला.ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
    यावेळी ‘सा.साक्षी पावनज्योत’ या साप्ताहिकाचा अंक भेट देऊन जाधव यांचा सन्मान करण्यात आला.हे वृत्तपत्र निर्भीड व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले सुभाष द. घोडके यांच्या लेखणीतून साकारलेले आहे.
    कार्यक्रमाला सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,संचालक डॉ.संजय कांबळे,सेवानिवृत्त प्रा.बप्पा मेटे, उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,
    उपसंपादक अरविंद शिंदे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    यावेळी बोलताना हनुमंत जाधव यांनी सांगितले की, “कधीही छोट्या कामाची लाज बाळगू नका.प्रामाणिकपणा,मेहनत आणि सातत्य या गुणांच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट गाठता येते.”
    शिपाईपासून ‘प्रबंधक’ पदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास केवळ पदोन्नतीचा नाही,तर संघर्ष,जिद्द आणि आत्मविश्वासाचा प्रेरणादायी आदर्श ठरत असून तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
error: Content is protected !!