March 13, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा ऐतिहासिक विजय; अध्यक्षपदी सौ.अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदी सौ.उषाताई गायकवाड

  • धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन करत अध्यक्षपदी सौ.अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी सौ.उषाताई रवींद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झालेल्या निवड प्रक्रियेत ५५ पैकी तब्बल ४५ मते महायुतीला मिळाल्याने हा विजय मोठ्या मताधिक्याने मिळाल्याचे स्पष्ट झाले.
    सौ.अर्चना पाटील यांच्या रूपाने प्रथमच धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला आले असून हा क्षण ऐतिहासिक आणि अभिमानास्पद मानला जात आहे.जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांवर दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे हा विजय शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    निवडीनंतर नूतन अध्यक्ष सौ. अर्चना राणा जगजितसिंह पाटील आणि उपाध्यक्ष सौ.उषाताई रवींद्र गायकवाड यांची अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल,पायाभूत सुविधा, शिक्षण,आरोग्य आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारे निर्णय अधिक वेगाने घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

  • महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अधिक बळ मिळत असून धाराशिव जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
    यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,माजी खासदार रविंद्र गायकवाड, आमदार राहुल मोटे,आमदार ज्ञानराज चौगुले तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आगामी कार्यकाळासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा परिषद विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या कामांसाठी नवे आदर्श निर्माण करेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!