March 13, 2026

१६ वर्षांच्या संघर्षाला न्याय : लखन गायकवाड कळंब नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष;आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास

  • लखन अण्णांचा उपनगराध्यक्षपदापर्यंतचा प्रवास; आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाने कळंबच्या विकासाला नवी दिशा

  • कळंब शहरातील समता नगर, पुनर्वसन सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लखन बळीराम गायकवाड उर्फ अण्णा यांची कळंब नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी झालेली निवड ही कळंब शहरासाठी तसेच दलित-बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.गेली सुमारे सोळा वर्षे समाजसेवा,पक्षनिष्ठा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या संघर्षाचे आणि कष्टाचे फलित आहे.
    लखन अण्णांनी २००८ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून सामाजिक व राजकीय कार्याची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःला झोकून दिले.कळंब शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळे कळंब शहरात त्यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण झाली आहे.विवाह समारंभ असो, अंत्यसंस्कार असोत किंवा एखाद्या कुटुंबावर आलेले संकट असो,अण्णा नेहमी मदतीसाठी पुढे येतात.
    कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबांना अन्नधान्य,औषधे आणि आवश्यक मदत देऊन त्यांनी नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले. लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत अनेक गरजू कुटुंबांना त्यांनी आधार दिला.तसेच नोटबंदीच्या काळातही नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.संकटाच्या काळात लोकांसोबत राहण्याची हीच त्यांची कार्यशैली आज त्यांना समाजात विशेष ओळख मिळवून देणारी ठरली आहे.
    अण्णांचा आमदार राणा जगजितसिंह पाटील उर्फ दादा यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास आहे. त्यांच्या मते कळंब आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास दादांच्या मार्गदर्शनाखालीच शक्य आहे.त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत त्यांनी कधीही पदासाठी आग्रह धरला नाही किंवा नेतृत्वावर नाराजी व्यक्त करून पक्ष सोडण्याचा विचारही केला नाही. पक्षनिष्ठा आणि विकासाची भूमिका कायम ठेवत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.
    अलीकडे झालेल्या कळंब नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली.जनतेच्या पाठिंब्यामुळे त्यांना विजय मिळाला आणि उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा सन्मान मिळाला. त्यांच्या या निवडीमुळे दलित-बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

  • आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहराच्या विकासासाठी रस्ते,पाणीपुरवठा,शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये अधिक प्रभावी काम करण्याचा अण्णांचा निर्धार आहे.कळंब शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवून शहराचा सर्वांगीण विकास घडवण्याचे ध्येय त्यांनी व्यक्त केले आहे.
    लखन अण्णांची उपनगराध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ एका व्यक्तीचा विजय नसून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या संघर्षाला मिळालेला सन्मान मानला जात आहे.या माध्यमातून कळंब शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
  • ✍️✍️– अविनाश सुभाष घोडके
                 कार्यकारी संपादक
              सा.साक्षी पावनज्योत
error: Content is protected !!