September 20, 2026

जागतिक महिला दिनानिमित्त कळंबमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन;सहभागासाठी प्रवेश विनामूल्य

  • कळंब– जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) शाखा कळंब यांच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धा रविवार,दि.१५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कळंब येथील द्वारका नगरीतील मंदिर परिसरात पार पडणार आहेत.
    महिलांमधील सर्जनशीलता, कौशल्य आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची आणि पाककला स्पर्धा अशा तीन आकर्षक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे या सर्व स्पर्धांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला असून परिसरातील सर्व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
    स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांमधून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येणार असून स्पर्धा संपल्यानंतर लगेचच विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मानवी हक्क आणि सामाजिक न्याय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ॲड.झीनत प्रधान उपस्थित राहणार आहेत.त्यांच्या उपस्थितीत महिलांचा सन्मान आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.
    कळंब परिसरातील महिलांनी, बचत गटांनी तसेच विविध महिला संघटनांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
error: Content is protected !!