March 11, 2026

आढाळा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन;विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांना दिली प्रेरणा

  • कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र आदरांजली वाहण्यात आली.
    कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी सांगितले की,सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज महिलांना शिक्षण व प्रगतीची संधी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
    उपक्रमशील शिक्षिका शिवनंदा स्वामी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आज महिला आत्मसन्मानाने आणि स्वाभिमानाने जगत आहेत, त्याचा भक्कम पाया सावित्रीबाई फुले यांनीच घातला आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात स्त्री शिक्षणाबाबत जागृती निर्माण झाली.
    शिवव्याख्याते महादेव खराटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून सावित्रीमाईंनी केलेले कार्य अतुलनीय असून ते आजही समाजात समानता व प्रगतीसाठी प्रेरणा देणारे आहे.
    कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी गायन स्पर्धा तसेच पाढे पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बलभीम राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक बापू हजारे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा मिळाली.
error: Content is protected !!