March 6, 2026

पालकांनी मुलांवर प्रेमाबरोबर शिस्तीचा धाक ठेवला तरच सक्षम पिढी घडते – डॉ.पांडुरंग भवर

  • सावित्रीबाई फुले विद्यालयात नववीच्या विद्यार्थ्यांचा पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

  • कळंब ( साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – “कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि स्वतःच्या जबाबदारीने करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी आई-वडील दोघांनीही निर्भय आणि ठाम भूमिका घेतली पाहिजे.मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या शिक्षणावर लक्ष ठेवून योग्य वेळी शिस्त लावली तरच गुणी आणि जबाबदार भावी पिढी घडू शकते,”असे प्रतिपादन रणसम्राट क्रीडा मंडळ,कळंबचे उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग भवर यांनी केले.
    ते शहरातील दि.५ मार्च २०२५ वार गुरुवार रोजी सावित्रीबाई फुले विद्यालयात आयोजित इयत्ता नववीच्या विद्यार्थी-पालक मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे होते.
    अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मुंडे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मुलगा-मुलगी असा भेद न करता सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पाठवा.चांगले शिक्षण आणि उत्तम संस्कार देण्याची जबाबदारी शाळा प्रामाणिकपणे पार पाडत आहे.मात्र विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे.मुलांनी नियमित शाळेत उपस्थित राहावे यासाठी पालकांनी योग्य नियोजन करावे.”

  • कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अविनाश घोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,“विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द,चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश संपादन करावे. मनात सकारात्मकता ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळा ठरत नाही.”

  • कळंब शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. नववीतील विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात दहावीत प्रवेश घेणार असल्याने त्यांच्या अभ्यासाचे नियोजन तसेच उन्हाळी तास सुरू करण्याबाबत या मेळाव्यात चर्चा करण्यात आली.
    या कार्यक्रमाला प्रा.अनिरुद्ध पवार,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.मीनाक्षी शिंदे– भवर,उपमुख्याध्यापक सोमनाथ सावंत,स्काऊट-गाईड कॅप्टन प्रतिभा गांगर्डे,सहशिक्षक प्रकाश पाळवदे,तानाजी गोरे,सचिन सलगर,परमेश्वर मोरे आदी उपस्थित होते.पालक प्रतिनिधी म्हणून श्री.कोकाटे व सौ.कवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात सहशिक्षक राहुल गायसमुर्दे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी एनएमएमएस परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक शंकर गोंदकर यांनी केले,तर सूत्रसंचालन जीवनसिंह ठाकूर यांनी केले.आभार प्रदर्शन शितल थोरात यांनी मानले.या प्रसंगी शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!