February 26, 2026

धाराशिवमध्ये ८ पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुका ६ मार्चला

  • जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे आदेश;पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर
  • धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव (सामान्य प्रशासन) यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका दि.६ मार्च २०२६ रोजी संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात येणार आहेत.सार्वत्रिक निवडणुका ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडल्या असून शासन अधिसूचना व लागू नियमांनुसार ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
    जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.) यांनी दिलेल्या आदेशानुसार धाराशिव, तुळजापूर,उमरगा,लोहारा,कळंब, वाशी,भूम व परंडा या पंचायत समित्यांसाठी स्वतंत्र पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी विहित नमुन्यातील नोटीस बजावून विशेष सभा पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    आरक्षणाचा तपशील हा पुढीलप्रमाणे आहे– सभापती पदासाठी विविध पंचायत समित्यांमध्ये सर्वसाधारण (महिला),सर्वसाधारण,अनुसूचित जाती,नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) अशी आरक्षण रचना लागू आहे.यानुसार संबंधित समित्यांमध्ये निवड प्रक्रिया होणार आहे.
    *वेळापत्रक जाहीर –*
    दि.६ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील.दुपारी २ वाजता विशेष सभेला प्रारंभ होईल. नामनिर्देशनपत्रांची तपासणी, वैध उमेदवारांची नावे जाहीर करणे, उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया आणि आवश्यक असल्यास मतदान अशी संपूर्ण कार्यवाही पार पडेल.प्रथम सभापती पदाची निवडणूक आणि त्यानंतर उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात येईल.निकाल तत्काळ जाहीर करण्यात येणार असून इतिवृत्ताची प्रमाणित प्रत त्याच दिवशी सादर करण्याचे निर्देश आहेत.
    निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक व्यवस्था संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी ठेवावी,असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
    जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
error: Content is protected !!