कळंब – वर्धा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कळंबच्या संकल्प व्हॉलीबॉल क्लबच्या तीन खेळाडूंनी शहराचा मान उंचावला आहे.त्यांच्या या यशाबद्दल क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. वर्धा येथे आयोजित स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेत संकल्प क्लबच्या सारिका कांबळे,प्रीती कवडे व प्रतीक्षा गायकवाड या तिघींनी सहभाग नोंदवला. यापूर्वी शहापूर (ता.देगलूर,जि. नांदेड) येथे झालेल्या युथ चॅम्पियन व्हॉलीबॉल निवड चाचणीत या तिघींची निवड झाली होती. १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत संकल्प क्लबची खेळाडू सारिका कांबळे हिने लातूर विभागाची कर्णधार म्हणून जबाबदारी समर्थपणे पार पाडत उत्कृष्ट नेतृत्व दाखवले.तिच्या नेतृत्वगुणांमुळे आणि संघभावनेमुळे संपूर्ण विभागाचे लक्ष वेधले गेले. संकल्प क्लबच्या मुली सातत्याने राज्यभर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याने शहरात त्यांच्या कामगिरीची चर्चा रंगू लागली आहे.ग्रामीण भागातून पुढे येत मोठ्या स्तरावर खेळण्याचे धाडस आणि मेहनत यामुळे या मुली इतरांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी क्लबचे खेळाडू अनिकेत भालेराव,द्रु पटेल,आदित्य आकुसकर,रोनक रुणवाल,संकेत यादव,भार्गव शेंडगे,बिरसा उबाळे, जानवी पवार,धनश्री करंजकर, तेजश्री करंजकर,दीक्षा गायकवाड,स्नेहा थोरबोले व माहेश्वरी जमादार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संकल्प व्हॉलीबॉल क्लबचे प्रशिक्षक रतन काका उबाळे यांनी कठोर परिश्रम आणि नियोजनबद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर या खेळाडूंना घडवले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मुलींनी राज्यस्तरावर झेप घेतली असल्याचे सर्वांनी नमूद केले. कळंबच्या क्रीडाक्षेत्रात संकल्प व्हॉलीबॉल क्लबचे योगदान दिवसेंदिवस भक्कम होत असून, येणाऱ्या काळात या खेळाडू राष्ट्रीय स्तरावरही चमकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
More Stories
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी
सिद्धांत नगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य डिजिटल कमान व CCTV कॅमेऱ्यांचे लोकार्पन उत्साहात
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी-परंपरांना छेद देत शिक्षणातून समतेचा मार्ग दाखविला – सोपान पवार