February 24, 2026

कष्ट,प्रामाणिकपणा आणि ध्येयवेड – सौ.अश्विनी आंबिरकर यांची यशोगाथा ठरतेय महिलांसाठी आदर्श

  • डिकसळ या ग्रामीण गावात साध्या कुटुंबात संसाराची जबाबदारी सांभाळताना सौ. अश्विनी कैलास आंबिरकर यांनी आयुष्याकडे केवळ परिस्थिती म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले.घरची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही त्यांनी खचून न जाता स्वतःच्या कष्टावर उभे राहण्याचा निर्धार केला.संसार सुरळीत चालावा,मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि कुटुंबाला स्थैर्य मिळावे या एकाच ध्येयाने त्यांनी छोट्या प्रमाणात किराणा दुकान सुरू केले.
    सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. भांडवल कमी,ग्राहक कमी आणि स्पर्धा जास्त अशा अनेक अडचणी होत्या.मात्र त्यांनी संयम, प्रामाणिक व्यवहार आणि सातत्य या गुणांच्या बळावर ग्राहकांचा विश्वास जिंकला.त्यांच्या दुकानात मिळणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता आणि वेळेवर मिळणारी सेवा यामुळे हळूहळू गावकऱ्यांचा ओढा वाढू लागला.दुकान म्हणजे केवळ व्यवसाय नसून लोकांच्या दैनंदिन गरजांची जबाबदारी आहे, ही भावना त्यांनी जपली.
    किराणा दुकानासोबतच गावातील महिलांची आणि शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांनी पिठाची चक्कीही सुरू केली.हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला.सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करत त्यांनी व्यवसायात सातत्य ठेवले. उन्हाळा असो,पावसाळा असो किंवा सणासुदीची गर्दी असो—त्यांची मेहनत कधी कमी झाली नाही.प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत त्यांनी व्यवसाय अधिक सक्षम केला.
    या सर्व प्रवासात त्यांनी आपल्या कुटुंबालाही तितकेच महत्त्व दिले. त्यांचा पुत्र शिवतेज आंबीरकर आणि कन्या शिवानी आंबीरकर हे दोघेही गावातील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शिक्षण घेत आहेत. मुलांनी चांगले शिकावे, मोठे व्हावे आणि समाजात स्वतःची ओळख निर्माण करावी, ही त्यांची मोठी स्वप्ने आहेत. व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नाचा योग्य वापर करून त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले आहे.
    आज डिकसळमध्ये सौ.अश्विनी आंबिरकर यांचे नाव विश्वास,कष्ट आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनले आहे.त्यांनी सिद्ध करून दाखवले की स्त्रीने ठरवले तर ती घर आणि व्यवसाय दोन्ही यशस्वीपणे सांभाळू शकते. त्यांच्या आयुष्याची गाथा ही केवळ आर्थिक प्रगतीची कथा नाही, तर आत्मविश्वास,जिद्द आणि चिकाटीने उभारलेल्या स्वाभिमानी जीवनाची कहाणी आहे.
    परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत,ध्येय आणि अढळ विश्वास यांच्या जोरावर यश नक्कीच मिळते,हे त्यांच्या जीवनप्रवासातून स्पष्टपणे दिसून येते.
    अश्विनीच्या जिद्द चिकाटी आणि परिश्रमाचे कौतुक म्हणून संपादक सुभाष द.घोडके यांनी सा.साक्षी पावनज्योत चा अंक देवून प्रेरणादायी थाप दिली.
error: Content is protected !!