कसबे-तडवळे – मराठवाड्यातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात मोलाचा ठसा उमटविणाऱ्या २२-२३ फेब्रुवारी १९४१ रोजी झालेल्या महार-मांग वतनदार परिषदेचा ऐतिहासिक वर्धापन दिन कसबे-तडवळे येथे उत्साहात संपन्न झाला.ही परिषद विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती.त्या काळात महार व मांग समाजावर अन्यायकारक वतन पद्धती व सामाजिक भेदभावाचे सावट होते.या पार्श्वभूमीवर झालेल्या परिषदेने मराठवाड्यातील दलित चळवळीला नवी दिशा दिली होती. स्मृतीदिनानिमित्त सकाळी कळंब रोड रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेची प्रतिकात्मक पूजा करून डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांची मिरवणूक काढलेल्या बैलगाडीचे प्रतीक म्हणून सजविलेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात व जयभीमच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. मिरवणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोहोचली.याच शाळेतील वर्गखोलीत डॉ.बाबासाहेबांनी मुक्काम केल्याची ऐतिहासिक नोंद असल्याने त्या ठिकाणी त्यांच्या छायाचित्राला हार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर रॅली वैशाली बुद्ध विहार येथे येऊन थांबली.येथे सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. भोजनानंतर लातूर येथील गायक पथकाने सादर केलेल्या भीमगीतांनी कार्यक्रमाला प्रेरणादायी रंग चढविला. कार्यक्रमाच्या आयोजनात दत्ता निकाळजे,साहेबराव भालेराव, गंगाधर सोनवणे,आत्माराम भालेराव,सुरज भालेराव, बाबासाहेब भालेराव,जयशील भालेराव,युवराज भालेराव,तेजस भालेराव,संजय सोनवणे,सुधाकर निकाळजे,विजय भालेराव, मारुती सोनवणे,चंदू भालेराव, अमित ढवारे,धनाजी भालेराव आदींनी परिश्रम घेतले. या स्मृती सोहळ्यामुळे सामाजिक न्याय,समता व स्वाभिमानाच्या लढ्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचली.कसबे-तडवळे गावाने पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक वारशाची उजळणी करत बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले. विशेष म्हणजे आमदार कैलास पाटील यांनी ही प्रत्यक्ष हजर राहून पावन भूमीस अभिवादन केले.
More Stories
१४ मार्च रोजी लिपिक टंकलेखक (गट क) पदभरतीची ऑनलाईन परीक्षा
‘पीएमएफएमई’मुळे धाराशिवमध्ये ५०४ प्रस्तावांना मंजुरी
७० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना कार्ड’ विशेष मोहीम