February 24, 2026

लेखकाने स्वतःचे साहित्य जन्मभूमीत प्रकाशित करावे — ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे

  • देवळाली (ढोकी) येथे ८८ समावेशक ९९ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
  • कळंब – देवळाली (ढोकी) ता. कळंब जि.धाराशिव येथे रविवार दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता लेखक सी.आर.घाडगे लिखित समावेशक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. साहित्यप्रेमी,शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा संस्मरणीय ठरला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माणिकराव रोहिले होते. सुप्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार व ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक दिलीप दिगंबर सागर (लातूर),ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही. सरवदे (कळंब) तसेच साप्ताहिक साक्षी पावन ज्योतचे संपादक सुभाष द.घोडके उपस्थित होते.

  • प्रास्ताविकात पुस्तकातील आशय स्पष्ट करताना सांगण्यात आले की,समावेशक या आत्मचरित्रात्मक ग्रंथात प्रज्ञा, शील आणि करुणा या मानवतावादी मूल्यांचा वेध घेत समाजातील विविध घटकांमध्ये समता व एकात्मतेची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.बदलत्या सामाजिक वास्तवात समावेशक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करणारे हे पुस्तक अभ्यासक व वाचकांसाठी मार्गदर्शक ठरेल,अशी अपेक्षा लेखक सी.आर.घाडगे यांनी व्यक्त केली.
    प्रमुख मार्गदर्शन करताना योगीराज वाघमारे म्हणाले,लेखकाने स्वतःचे साहित्य जन्मभूमीत प्रकाशित करावे. आपल्या मातीतूनच शब्दांना बळ मिळते आणि आपल्या लोकांनीच त्या विचारांना पहिला प्रतिसाद द्यावा.त्यांनी मूल्याधिष्ठित लेखन, सामाजिक बांधिलकी आणि स्थानिक साहित्यचळवळीचे महत्त्व अधोरेखित केले.

  • ज्येष्ठ साहित्यकार के.व्ही.सरवदे यांनी समावेशक मधून घाडगे सरांनी आपला जीवनपट प्रभावीपणे उलगडला असल्याचे सांगितले.पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी घाडगे सरांनी पुस्तकातून गावकऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली असल्याचे नमूद केले.तर प्रमुख अतिथी सुभाष घोडके यांनी समावेशक या आत्मचरित्रातून तरुणांना प्रेरणा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.

  • अध्यक्षीय समारोपात प्राचार्य माणिकराव रोहिले यांनी सी. आर.घाडगे हे गावातील गुणवंत व पहिले पदवीधर असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
    यावेळी राजाभाऊ माने,अंकुश लोमटे,सुरेश लोमटे,विश्वासराव लोमटे,महेंद्र रणदिवे,सहशिक्षक सचिन भांडे,संजय धावारे,लेखक जयराज खुणे,सरपंच अविनाश भानवसे,उपसरपंच अजितसिंह पाटील,पंचायत समितीचे माजी सदस्य रत्नाकर देशमुख तसेच गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • कार्यक्रमाचे आयोजन भाऊसाहेब प्रभाकर घाडगे,रंजन चतूर्भूज घाडगे व केतन चतूर्भूज घाडगे यांनी केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिकराव जगताप,फुलचंद महाजन,बाळासाहेब महाजन, पंडित गुरव,वामन महाजन,भगवान आदाटे,ज्योती शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिकराव जगताप यांनी तर आभार प्रदर्शन महादेव घाडगे यांनी केले.
    समावेशक विचारांना बळ देणारा व समाजमनाला सकारात्मक दिशा देणारा हा प्रकाशन सोहळा साहित्यवर्तुळात चर्चेचा विषय ठरला.

error: Content is protected !!