धाराशिव (जिमाका)– एकत्रित Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana अंतर्गत ७० वर्षे व त्यावरील नागरिकांचे “आयुष्मान वय वंदना कार्ड” निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागात गावनिहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. सध्या जिल्ह्यात ७० वर्षे व त्यावरील ९७ हजार ७४१ लाभार्थी पात्र असून त्यापैकी १४,८३८ (१५ टक्के) लाभार्थ्यांचे आयुष्मान वय वंदना कार्ड ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी आशा कर्मचारी,स्वस्त धान्य दुकान चालक तसेच आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रती यशस्वी ई-केवायसीसाठी २० रुपये व आयुष्मान कार्ड वितरणासाठी १० रुपये असे एकूण ३० रुपये मानधन देण्याबाबत शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत उपचाराचा लाभ मिळतो. तसेच ७० वर्षे व त्यावरील “आयुष्मान वय वंदना कार्ड” धारकांना प्रति लाभार्थी प्रति वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत २३९९ आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया व उपचार सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा जिल्ह्यातील २७ खाजगी व १३ शासकीय अशा एकूण ४० रुग्णालयांमध्ये तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र,CSC केंद्र,रेशन दुकानदार, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येणार आहे.७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी “आयुष्मान वय वंदना कार्ड” काढून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे. सदर विशेष मोहीम २० फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.संबंधित कर्मचारी गाव,वॉर्ड,वाडी,वस्ती, शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन आयुष्मान कार्डचे ई-केवायसी करणार आहेत. लाभार्थ्यांना स्वतःही ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अँड्रॉईड मोबाईलमध्ये आयुष्मान अॅप डाउनलोड करून ‘Beneficiary’ बटनवर क्लिक करून लाभार्थी स्वतःचे ई-केवायसी करू शकतात. तसेच ‘Operator Login’ मधून “For Senior Citizens of the age of Seventy years & Above – CLICK HERE TO ENROLL” या पर्यायाद्वारे “आयुष्मान वय वंदना कार्ड” काढता येणार आहे.अन्यथा ग्रामपंचायत, CSC केंद्र,आशा स्वयंसेविका, रेशन दुकानदार किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधूनही ई-केवायसी करून घेता येईल. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली गावनिहाय नियोजन करण्यात आले असून सर्व विभागांच्या समन्वयातून मार्च २०२६ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७० वर्षे व त्यावरील सर्व लाभार्थ्यांचे १०० टक्के ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी दिली.
More Stories
१४ मार्च रोजी लिपिक टंकलेखक (गट क) पदभरतीची ऑनलाईन परीक्षा
‘पीएमएफएमई’मुळे धाराशिवमध्ये ५०४ प्रस्तावांना मंजुरी
ॲड.गुंड,काळे,घोलप,पवार, सुर्यवंशी,सोनवणे पवनराजे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित