२३ फेब्रुवारीला खवा क्लस्टर भूम येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम
धाराशिव (जिमाका) – केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रत्येक जिल्ह्यात आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME) ही योजना सन २०२०-२१ पासून राबविण्यात येत आहे.या योजनेमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उत्पन्न मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे. जिल्ह्यात बेरोजगारी सातत्याने वाढत असताना अनेक सुशिक्षित युवकांना रोजगार मिळण्यात अडचणी येत आहेत.भांडवलाच्या अभावामुळे उद्योग उभारणीस अडथळे निर्माण होतात.या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुरू केली आहे. या योजनेत बेरोजगार युवक-युवती, बचत गट,शेतकरी गट,संस्था तसेच अग्रो कंपन्यांना अर्ज करता येतो.शासन एकूण कर्ज रकमेवर ३५ टक्के अनुदान (सब्सिडी) देत असल्याने उद्योग उभारणीस मोठी मदत मिळते.असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगांना संघटित व नोंदणीकृत करून तयार उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येणार असून शेतकरी,बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही अर्ज करता येतो.विशेष म्हणजे,सात-बारा उतारा नसतानाही या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी शासनाने प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मानधन तत्त्वावर एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे.प्रस्ताव सादर करण्यापासून ते मंजुरीपर्यंत मोफत मार्गदर्शन केले जाते.उद्योग मंजूर झाल्यानंतर तो सुरळीतपणे चालविण्यासाठी शासनाकडून ३५ टक्के अनुदान दिले जाते. PMFME योजनेअंतर्गत सन २०२०-२१ पासून चालू आर्थिक वर्षापर्यंत जिल्ह्यात एकूण ५०४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी ४१३ उद्योग सुरू झाले आहेत.यामध्ये १०७ खवा व तूप उद्योगांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यातील खवा उत्पादक व व्यापाऱ्यांना निर्यात संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी APEDA (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण), मुंबई,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय,धाराशिव तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता खवा क्लस्टर,महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्र भूम येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते होणार आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा
एमएचटी-सीईटी परीक्षा कडेकोट बंदोबस्त;केंद्र परिसरात कलम १६३ लागू
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी