- कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ अध्यापक विद्यालय,कळंब येथे डी.एल.एड.चे प्रथम वर्ष शिक्षण घेत असलेला १९ वर्षीय आर्यन अनिल जगताप आपल्या अप्रतिम पेन्सिल स्केच कलेमुळे परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या आर्यनने कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता स्वतःच्या मेहनतीने आणि सातत्यपूर्ण सरावाने ही कला आत्मसात केली आहे.साध्या पेन्सिलच्या साहाय्याने तो व्यक्तींच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील चमक,केसांची रचना, तसेच प्रकाश-छायांचे बारकावे अत्यंत अचूकपणे टिपतो.त्यामुळे त्याची चित्रे पाहताना ती जणू काही छायाचित्रच असल्याचा भास निर्माण होतो. 
आर्यनने आतापर्यंत अनेक महापुरुषांची चित्रे रेखाटली असून त्यात ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे, समाजसुधारक,तसेच विविध क्षेत्रांतील नामवंतांचा समावेश आहे.त्याचबरोबर निसर्गचित्रे, ग्रामीण जीवनातील प्रसंग,तसेच दैनंदिन जीवनातील साध्या वस्तूंचीदेखील तो वास्तवदर्शी मांडणी करतो.त्याच्या प्रत्येक चित्रामागे अनेक तासांचा परिश्रम आणि बारकाईने केलेला अभ्यास दडलेला असतो.
शिक्षण घेत असतानाच कला जोपासणे हे सोपे काम नाही; मात्र आर्यन अभ्यास आणि छंद यांचा सुंदर समतोल साधतो. डी.एल.एड.चा विद्यार्थी असल्याने भविष्यात शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये कला आणि सर्जनशीलतेची प्रेरणा निर्माण करण्याचे त्याचे स्वप्न आहे. “कला ही केवळ छंद नसून मनःशांती देणारी साधना आहे,” असे तो सांगतो.
या कलेच्या प्रवासात त्याला त्याचे वडील छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे डॉ.अनिल जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.मुलाच्या कलेला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले असून आवश्यक साहित्य,वेळ आणि मानसिक आधार देत त्याची जिद्द अधिक बळकट केली आहे. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच आपली कला अधिक खुलली असल्याचे आर्यन नम्रपणे सांगतो.
समाजातून त्याच्या कलेचे कौतुक होत असून विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.महाराष्ट्रात हळूहळू दुर्मिळ होत चाललेल्या हस्तरेखांकन कलेला नवसंजीवनी देण्याचे काम आर्यन करत आहे.डिजिटल युगातही पेन्सिल आणि कागदाच्या माध्यमातून जिवंत वास्तव साकारण्याची त्याची धडपड अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भविष्यात स्वतःचे चित्रप्रदर्शन भरविणे,विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आणि कला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणे,असा त्याचा मानस आहे. आर्यन जगतापच्या या कलायात्रेला उज्ज्वल यश लाभो, अशा शुभेच्छा सर्वत्र व्यक्त होत आहेत.
आर्यन अनिल जगताप







More Stories
सा.साक्षी पावनज्योतच्या प्रतिनिधींची नियुक्ती
शिवजयंतीनिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन
सेवानिवृत्त मंडळ अधिकारी भागवत वाघमारे यांना बंधूशोक