कळंब – देवळाली (ढोकी) ता. कळंब जि.धाराशिव येथे रविवार दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘समावेशक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून साहित्यप्रेमींसाठी हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. लेखक सी.आर.घाडगे लिखित ‘समावेशक’ या पुस्तकात प्रज्ञा, शील आणि करुणा या मानवतावादी मूल्यांचा वेध घेत समाजातील विविध घटकांमध्ये समतेची व एकात्मतेची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.बदलत्या सामाजिक वास्तवात समावेशक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करणारे हे पुस्तक अभ्यासक व वाचकांसाठी मार्गदर्शक ठरेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य माणिकराव रोहिले भूषविणार आहेत.प्रमुख अतिथी म्हणून योगीराज वाघमारे (सुप्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार व ज्येष्ठ साहित्यिक,सोलापूर) यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढणार असून साहित्यविषयक मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप दिगंबर सागर (पोलीस इन्स्पेक्टर, लातूर),के.व्ही.सरवदे (ज्येष्ठ साहित्यिक,कळंब) तसेच सुभाष द.घोडके (संपादक,साक्षी पावन ज्योत,कळंब) उपस्थित राहणार आहेत.मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य, समाजप्रबोधन व मूल्याधिष्ठित लेखन यावर विचारमंथन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन भाऊसाहेब प्रभाकर घाडगे,रंजन चतूर्भूज घाडगे व केतन चतूर्भूज घाडगे यांनी केले आहे. परिसरातील साहित्यप्रेमी, शिक्षक,विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाजमनाला सकारात्मक दिशा देणारा व समावेशक विचारांना बळ देणारा हा कार्यक्रम ठरणार असल्याची भावना साहित्यवर्तुळात व्यक्त होत आहे.
More Stories
सा.साक्षी पावनज्योतच्या प्रतिनिधींची नियुक्ती
शिवजयंतीनिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन
सेवानिवृत्त मंडळ अधिकारी भागवत वाघमारे यांना बंधूशोक