February 8, 2026

“जिल्हा परिषद निवडणुकीत मंगरूळ गटाचा अजेंडा:विकास की फक्त राजकारण?”

  • पिंपळगाव (डोळा) (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – धाराशिव जिल्हा परिषदेच्या कळंब तालुक्यातील १० मंगरूळ गटात सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धामधूम सुरू झाली आहे.
    या गटात एकूण २०,८१२ मतदार असून मंगरूळ गणातील मंगरूळ, भाटशिरपुरा,पिंपळगाव डोळा, शेळका धानोरा,खेर्डा,बोर्डा या गावांतील १०,५८५ मतदार आहेत. तर हासेगाव गणातील हावरगाव, तांदुळवाडी,आढाळा,आथर्डी, पाथर्डी,खोंदला,सात्रा,भाटसांगवी या गावांतील १०,२३७ मतदार आहेत.
    या गटात यंदा चार उमेदवार निवडणूक रिंगणात असून राजकीय समीकरणे चांगलीच तापली आहेत.मंगरूळ येथील जयवंत रामभाऊ कुंभार हे महायुती (भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे गट) कडून कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत.ताडगाव येथील बालासाहेब धनराज जाधवर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून मशाल चिन्हावर मैदानात आहेत. आढाळा येथील भिमराव धर्मराज हगारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेस आघाडी तर्फे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत.तर भाटशिरपुरा येथील प्रतिक प्रकाश गायकवाड हे अपक्ष म्हणून नांगर चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
    दरम्यान,निवडणुकीचा प्रचार जरी जोरात सुरू असला तरी गटातील मतदारांमध्ये “निवडून गेल्यावर आमच्या गावासाठी नेमकं काय काम होणार?”हा प्रश्न अधिक तीव्र होत आहे.अनेक गावांत रस्ते, पिण्याचे पाणी,आरोग्य सुविधा, शाळा दुरुस्ती,दलित वस्ती सुधारणा,गटार-स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर ठोस कामे अपेक्षित असल्याचे मतदार सांगत आहेत.
    जिल्हा परिषद सदस्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे गटातील विकासकामांसाठी निधी आणणे, मंजुरी मिळवणे,योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे व प्रशासनावर नियंत्रण ठेवणे होय. त्यामुळे यंदा मतदारांनी चिन्ह किंवा पक्ष नव्हे तर विकासाचा स्पष्ट आराखडा आणि कामाचा हिशेब मागूनच मतदान करावे, अशी मागणी गटातील सुज्ञ मतदारांकडून होत आहे.
error: Content is protected !!