February 8, 2026

शिवसेनेतील एबी फॉर्म वादाचा पहिला बळी;अविनाश खापेंवर निलंबनाची कारवाई

  • धाराशिव – शिवसेना शिंदे गटात एबी फॉर्म व उमेदवारी वाटपावरून निर्माण झालेल्या वादाला आता शिस्तभंगाची किनार मिळाली असून पक्षविरोधी काम व पक्षाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत युवासेना लातूर व बीड जिल्ह्याचे निरीक्षक अविनाश खापे यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.शिवसेनेतील एबी फॉर्म वादाचा हा पहिला बळी मानला जात असून आगामी काळात आणखी पक्षीय हालचाली घडण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
    माहितीनुसार,अविनाश खापे यांनी शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांना फोन करून उमेदवारी व एबी फॉर्म वाटपाबाबत जाब विचारला होता. या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला वळण लागले.यानंतर शिवसैनिकांनी धाराशिव येथे जाब विचारत नाराजी व्यक्त केली होती.
    दरम्यान,पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी यापूर्वीच खापेंवर कारवाईचे संकेत दिले होते.पक्षाचे नेते व माजी आमदार असलेल्या साळवी यांचा अपमान सहन केला जाणार नाही.प्रसिद्धीसाठी ऑडिओ व्हायरल करणे चुकीचे आहे,असे सरनाईक यांनी स्पष्ट केले होते.
    युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी खापे यांना दिलेल्या पत्रात, “आपण पक्षविरोधी कृत्य करून संघटनेची प्रतिमा मलीन केली असून हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे.वरिष्ठांच्या आदेशानुसार आपल्याला पदावरून निलंबित करण्यात येत आहे,”असे नमूद करण्यात आले आहे.
    एबी फॉर्म वाटप व संघटनात्मक निर्णयांवरून हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता असून पुढील काळात अनेक राजकीय घडामोडी व पक्षीय बदल होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
error: Content is protected !!