कळंब – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.शिवसेना (उबाठा) गटाला बाजूला ठेवत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यात निवडणुकीची चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या संदर्भात काँग्रेस आयचे तालुका प्रमुख आप्पासाहेब शेळके व राष्ट्रवादी काँग्रेस (शप) तालुका प्रमुख तुषार वाघमारे यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढून दोन्ही पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याची भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की,महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाने तालुक्यातील सर्व गट-गणांमध्ये उमेदवार दिल्याने संयुक्त पॅनल शक्य झाला नाही. मात्र विरोधी पक्षाला सत्ता येण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्ष ठाम असून मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडून खामसवाडी, ईटकुर,शिराढोण व मंगरुळ या गटातून उमेदवार देण्यात आले असून काँग्रेस पक्षाकडून येरमाळा व डिकसळ गटातून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाकडून ईटकुर, शिराढोण,जवळा,मंगरुळ,गौर, रांजणी,नायगांव,देवळाली आदी गणांमध्ये उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.दोन्ही पक्षांनी कुठेही एकमेकांच्या विरोधात उमेदवार दिलेले नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले. दोन्ही पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना सहकारी पक्षाच्या उमेदवारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून मोजक्या जागांवर सक्षम उमेदवार देऊन सर्व जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या प्रसिद्धीपत्रकावर काँग्रेस आयचे तालुका प्रमुख आप्पासाहेब शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) तालुका प्रमुख तुषार वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार