मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. “अजितदादा हे माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते.त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना मनात आहे,”अशा भावपूर्ण शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस असून एक दूरदर्शी,स्पष्टवक्ता आणि अत्यंत अभ्यासू नेता राज्याने गमावला आहे. “महायुती सरकारमध्ये ते केवळ माझे सहकारी नव्हते, तर माझे जिवलग मित्रही होते. त्यांचे अकाली जाणे जीवाला चटका लावणारे आहे,” असेही त्यांनी नमूद केले. ‘वेळ साधण्याचा अप्रतिम गुण’ शोकसंदेशात उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र त्यांना प्रेमाने ‘दादा’ म्हणून ओळखत असे आणि ते खऱ्या अर्थाने तसेच होते. “त्यांच्याकडे वेळ साधण्याचा अप्रतिम गुण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सर्वांनी अनुभवली आहे. सहकारी म्हणूनच नव्हे तर मित्र म्हणूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मी जवळून पाहिले,” असे त्यांनी सांगितले. स्पष्टवक्तेपणा, विनोदबुद्धी आणि कोपरखळ्या अजितदादांचा स्पष्ट आणि नर्म विनोदी स्वभाव, तसेच त्यांच्या मार्मिक कोपरखळ्या सर्वांनाच आवडत असत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्याची आर्थिक घडी बसवण्यात मोठा वाटा महायुती सरकारमध्ये तीन पक्ष असूनही निर्णय एकसंधपणे आणि एकजुटीने घेतले गेले, असे सांगत शिंदे म्हणाले, “राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी अतिशय हातोटीने निर्णय घेतले. विकासकामांना खीळ बसू न देता त्यांनी अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना दिली.” मुख्यमंत्री असताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना व इतर योजनांसाठी अजितदादांनी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून वेळोवेळी पाठबळ दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धोरणात्मक निर्णयांत शिष्टाचाराचे भान “परखड आणि तडक निर्णय घेण्याची क्षमता म्हणून दादांचा महाराष्ट्राला परिचय होता. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सर्वच खात्यांची माहिती असायची. मात्र त्यांनी कधीही शिष्टाचाराची चौकट मोडली नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही,” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. व्यावहारिक विचार आणि लोकहिताचा आग्रह अजितदादा स्वप्नाळू सादरीकरणापेक्षा व्यावहारिक बाजू तपासून पाहत, असे सांगत शिंदे म्हणाले, “एखादी संकल्पना पुढे आली की तिचा सर्वांबाजूंनी विचार करायला ते भाग पाडत. ही योजना टिकेल का? देखभाल कशी होईल? लोकहिताची आहे का? किती जणांना उपयुक्त ठरेल?—अशा अनेक मुद्द्यांचा ते अभ्यास करत.” विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील तरुण मंत्र्यांनाही त्यांच्या कार्यशैलीबाबत कुतूहल असे. वेळप्रसंगी दादा ठणकावत, पण त्यामागे चुका काढण्यापेक्षा त्या पुन्हा होऊ नयेत ही तळमळ असे, असेही त्यांनी सांगितले. “आज दादा आपल्यात नाहीत… मनाला पटत नाही” “आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पनाही मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशाचा शेवट केला.
More Stories
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना दिली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा डंका
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी २०२६ रोजी मतदान ५ ऐवजी ७ फेब्रुवारी