कळंब — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी आयोजित विशेष राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिबिराच्या पाचव्या दिवशी मौजे डिकसळ येथे स्वयंसेवकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण केले तसेच शोषखड्ड्यांची प्रात्यक्षिके घेण्यात आली. यानंतर शिबिरात आयोजित बौद्धिक सत्रात डॉ. ईश्वर राठोड यांनी विद्यार्थ्यांना शाश्वत विकास आणि तरुण या विषयावर मार्गदर्शन केले.देशाचा शाश्वत विकास घडविण्याची मोठी जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर असून ती त्यांनी राष्ट्रकार्य म्हणून स्वीकारली पाहिजे,असे ते म्हणाले. आजचा तरुण हा देशाचा कणा असून तोच भविष्य घडवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ.नागनाथ आदाटे यांनी शेती व्यवसाय व व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादनात यशस्वी असला तरी योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे तो आर्थिकदृष्ट्या मागे पडतो, असे त्यांनी नमूद करत आधुनिक शेती व बाजारपेठेतील व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकुशराव यांनी केले तर आभार प्रा.डॉ.मीनाक्षी जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ताटीपामुल, प्रा. डॉ. चांदोरे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाच्या समन्वयक अर्चना मुखेडकर, तसेच प्रा. डॉ. सावंत, प्रा. डॉ. भोसले, प्रा. डॉ. चंदनशिवे, प्रा. डॉ. वाघमारे, प्रा. शिंदे, प्रा. तांबोळी, प्रा. पालके आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव, तसेच श्री. बंडगर व अर्जुन वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. या श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती, सामाजिक भान आणि शाश्वत विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड