March 26, 2026

कळंबमध्ये मुलींचा निर्भीड आवाज;टवाळखोरांविरोधात नगराध्यक्षा सुनंदा कापसे आक्रमक

  • कळंब – शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आणि टवाळखोरांना आळा घालण्यासाठी कळंब नगरपरिषद कार्यालयात एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक संपन्न झाली. सुरक्षित कळंब शहर,सुरक्षित मुलगी या घोषणेसह झालेल्या या बैठकीत अनेक विद्यार्थिनींनी कोणतीही भीती न बाळगता सार्वजनिक ठिकाणी,शाळा-महाविद्यालय परिसरात तसेच प्रवासादरम्यान होणाऱ्या छेडछाडीच्या घटना मोकळेपणाने मांडल्या.
    नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या पुढाकारातून आयोजित या बैठकीत वाढत्या छेडछाडीच्या घटना,टवाळखोरांचा त्रास, शाळा-महाविद्यालय परिसरातील असुरक्षितता या विषयांवर सखोल चर्चा झाली.या बैठकीस पोलीस प्रशासन,बसस्थानक प्रतिनिधी, शाळा-महाविद्यालये व कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी,पत्रकार, पालक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    बैठकीदरम्यान विद्यार्थिनींनी मांडलेल्या गंभीर तक्रारींची उपस्थित यंत्रणांनी गांभीर्याने दखल घेतली.सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर तसेच पिंक पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव यांनी तक्रारींची नोंद घेत तात्काळ अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले.
    यावेळी बोलताना नगराध्यक्षा सुनंदा कापसे म्हणाल्या, कळंब शहरातील प्रत्येक मुलगी,महिला व विद्यार्थी सुरक्षित असल्याची भावना मनात बाळगेल,हेच माझे ध्येय आहे.सुरक्षित शहर ही केवळ घोषणा नसून आमची जबाबदारी आहे.छेडछाड रोखण्यासाठी पोलीस,पालक,शाळा व नगरपरिषद एकत्र येऊन कडक कारवाई करू.
    पिंक पथकाच्या वतीने शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात गस्त वाढवण्यात येणार असून खासगी कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,तसेच मुलींनी हिम्मतीने पुढे येऊन सतावणाऱ्या मुलांविरोधात तक्रार करावी,असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव यांनी केले.
    बैठकीत शाळा व कॉलेज परिसरात पोलीस गस्त वाढवणे, सीसीटीव्ही व पिंक पथकाची सक्रियता वाढवणे, कर्णकर्कश हॉर्न, अल्पवयीनांच्या हातातील दुचाकी व बिनधास्त फिरणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
    या विशेष उपक्रमाअंतर्गत महिला सुरक्षेसाठी समन्वयित कृती आराखडा,जनजागृती, पालक-शिक्षक सहभाग तसेच पोलीस व नगरपरिषदेची संयुक्त यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे.या सकारात्मक बदलांमुळे उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त करत नगराध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत केले.
    या बैठकीस नगरपरिषद मुख्याधिकारी मंजुषा गुरमे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,नगरसेवक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
error: Content is protected !!