कळंब – कळंब तालुक्यात जन्म प्रमाणपत्र काढताना नागरिकांना येणाऱ्या विविध अडचणी, अनावश्यक विलंब व गैरसोयींबाबत दयावान प्रतिष्ठान, कळंब यांच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहणे,स्पष्ट व एकसंध मार्गदर्शनाचा अभाव,वारंवार तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणे यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जन्म प्रमाणपत्र हे शिक्षण, विविध शासकीय योजना,आधार कार्ड, पासपोर्ट आदींसाठी अत्यावश्यक दस्तऐवज असल्याने त्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले. तसेच कळंब तहसील कार्यालयात जन्म–मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती ठळकपणे दर्शविणे, अर्जांच्या स्थितीची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होईल अशी यंत्रणा उभारणे तसेच प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे सामान्य नागरिकांचा वेळ व खर्च वाचून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या निवेदनाच्या माध्यमातून कळंब तालुक्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर जिल्हा प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक व ठोस निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा दयावान प्रतिष्ठान, कळंब यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान भाई मुल्ला,ग्रामपंचायत सदस्य मुबीन मणियार,युवा उद्योजक समीर सय्यद,प्रतिष्ठानचे सचिव अभय गायकवाड यांच्यासह प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान