February 8, 2026

सावित्रीबाईंचे विचार म्हणजे परिवर्तनाची ज्वाला;ती विझू देऊ नका – प्रा.अंजली मोहेकर

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले युवती मंच व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
    या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा.अंजली मोहेकर म्हणाल्या,“सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा महायज्ञ सतत तेवत ठेवणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे. केवळ जयंती साजरी करून कर्तव्य पूर्ण होत नाही, तर त्यांच्या कार्याची सातत्याने जाणीव ठेवून समाजपरिवर्तनाच्या प्रवासात सहभागी होणे हेच त्यांना खरी आदरांजली आहे.”
    त्या पुढे म्हणाल्या,“आज पोलिस अधिकारी, न्यायाधीश, वकील, प्राचार्य, कुलगुरू अशा जबाबदारीच्या पदावर यशस्वी भूमिका निभावणारी स्त्री ही सावित्रीबाईंच्या प्रेरणेतून घडली आहे. आधुनिक काळातील प्रत्येक स्त्री ही एका अर्थाने ‘नवी सावित्री’ आहे. सावित्रीबाईंच्या विचारांमुळे स्त्री सशक्त झाली,आत्मविश्वासाने उभी राहिली आणि समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले. म्हणूनच त्यांच्या कार्याची छबी काळाआड जाऊ नये, यासाठी आपण सर्वांनी सजग राहिले पाहिजे.”
    कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले या केवळ नाव नाही तर परिवर्तनाची चळवळ असल्याचे सांगितले.उद्घाटक डॉ. दत्ता साकोळे व विशेष व्याख्यात्या डॉ. वर्षा सरवदे यांनीही आपल्या विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
    या प्रसंगी प्रा.डॉ दीपक सूर्यवंशी यांनी प्रा.अंजली मोहेकर यांना “सावित्रीबाई फुले गौरव ग्रंथ (पृ. ६५०)” भेट देत गौरव केला. सावित्रीबाई फुले युवती मंचतर्फे विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अर्चना मुखेडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रणिता खोसे तर आभार डॉ. रोहिणी लोहकरे यांनी मानले.
    या कार्यक्रमासाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, संचालक डॉ.संजय कांबळे, उपप्राचार्य कमलाकर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.विविध मान्यवर, प्राध्यापक,स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. राघवेंद्र ताटीपामूल व प्रबंधक हनुमंत जाधव यांनी सहकार्य केले.
error: Content is protected !!